Sunday, July 9, 2017

गझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने

गझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने 

झलेचा भारतीय उपखंडावरील प्रभाव स्पष्ट आहे. गेल्या दोन-तीनशे वर्षांच्या काळातील गझल लेखनाचा प्रभाव इथल्या जीवनावर आणि इथल्या जीवनाचा प्रभाव गझलेवर पडला आहे.  अनेक गझल, त्या गझलांमधले शेर लोकोक्तीचा भाग बनलेले आहेत, अजूनही बनत आहेत.  लोकजीवनात गझलेचे इतक्या मोठ्या प्रमाणावर रूळण्याचे काय कारण असावे?  ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित पौर्वात्य संस्कृतीत - आणि त्याहूनही अधिक इथल्या मानसिकतेत अथवा सामूहिक जाणीवेत दडलेले असावे. भारतीय तत्वज्ञान, भक्ती परंपरा आणि सूफी संप्रदायांची उदारमतवादी प्रेम-जाणीव ह्यांचा अनोखा संगम गझलेच्या चिंतनात झालेला दिसून येतो. भारतीय उपखंडातल्या लोकजीवनाकडे बघितल्यास असे दिसून येते, की इथला समाज अनेक पातळ्यांवर तुटलेला आणि विभाजित आहे.  धर्म, जात, भाषा, प्रांतिक अभिनिवेश अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पण एक मोठाच सामाजिक विरोधाभास हाही आहे, की एक उदारमतवादी विचारधारा ह्या खंडप्राय देशाच्या उंचसखल जमीनीतून शतकानुशतके वाहत आलेली आहे. हे चिंतन, ही विचारधारा वेगवेगळ्या भाषांमधून उभ्या राहिलेल्या भक्तीपरंपरा आणि संतकवींच्या माध्यमातून आलेली आहे.  भक्तीपरंपरेतली प्रेमाची, साधेपणाची शिकवण ह्या उदारमतवादी सर्वसमावेशकतेचा पाया आहे. या चिंतनाचे काहीसे 'भौतिक' रूप गझलेतून उतरून आलेले आहे. भक्तीपरंपरेत प्रेम आध्यात्मिक पातळीवरचे तर गझलेतले काहीसे अधिभौतिक - किंबहुना ह्या दोन पातळ्यांच्या मधले आहे.

कविता आणि चिंतन ह्यातला मूलभूत फरक आहे की चिंतन (किंवा तत्वज्ञान) गोष्टींची व्याख्या करण्याचा, आणि त्या व्याख्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते - तर कविता ही गोष्टींच्या - माणसावर, त्याच्या जीवनावर होणार्‍या परिणामाचा विचार करत असते. चांगल्या कवितेत हा विचार भावनेच्या किंवा निव्वळ कल्पनेच्या पलीकडे - जाणिवेच्या पातळीवर जाताना दिसून येतो.  गझल देखील ह्या गोष्टीला अपवाद नाही.  गझल ही रोमँटीक कविता आहे का?  ह्या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही देता येते. मी मागेच म्हटल्याप्रमाणे गझलेचा सुरुवातीचा तोंड्वळा पाहिला तर तो प्रियकराच्या व्यथित आणि अति भावनिक 'उद्गारांचा' दिसून येते.  त्यामुळे हे अति भावनिक उद्गार किंवा हुंकारयुक्त 'वक्तृत्व' म्हणजेच गझल आहे असा समज अनेकांचा होऊ शकतो.  पण हे गझलेचे सर्वंकष वर्णन किंवा स्वभाव नाही.  रोमँटीक कविता क्वचितच विचाराला प्राधान्य देताना दिसून येते. ह्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे थेट भावनिक प्रतिक्रिया - आणि भावनेच्या पातळीवर निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कल्पना आणि प्रतिमा.  गझल अशी कविता आहे का?  तर नक्कीच नाही.  गझलेचा शेर क्वचित भावनेच्या पातळीवर जाणारा असला - तरी तो निव्वळ भावुक अभिव्यक्ती नसतो. वेदनेने विव्हळणे एक आणि त्या वेदनेचे मूळ शोधू जाणे दुसरे. मानवी जीवन अथाह आहे, माणसाचे स्वभावविश्व महासागराप्रमाणे विशाल आहे. व्यक्तीचे अनुभवविश्व आणि लौकिक जग ह्यांचा परस्पर संबंध शोधणे हा गझलेचा मूळ स्वभाव आहे; आणि तिचा गाभा चिंतनाचा आहे.  पण हे चिंतन रूक्ष तत्वज्ञानाच्या भाषेत नाही - तसेच ह्या चिंतनाचा कल गोष्टींची व्याख्या करण्याचा देखील नाही. अभिव्यक्तीमधली उत्कटता आणि मानवीयता राखूनच गझल हे चिंतन करताना दिसून येते. अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात, गझलेतही आहेत.  निव्वळ भावनिक लेखन गझलेतही होतेच - पण त्यापलीकडे लिहिली जाणारी गझल बघणे ह्या दृष्टीने आवश्यक आहे. मराठी गझलेतली पहिली पिढी मात्र व्याज रोमँटिकतेच्या आहारी जाऊन बव्हंशी भावूक लेखन करती झाली हे ह्या ठिकाणी खेदाने नमूद करावेसे वाटते. ह्या पिढीने गझलेचा प्रवाह वाहता ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे काम केले हे मान्यच, पण आशय आणि विचारांच्या कसोट्यांवर ह्या पिढीचे लेखन तोकडे पडताना दिसून येते. सध्या मराठी गझलेत मुशायर्‍यांचा जोर आहे. या उपक्रमांमधून नवे कवी लोकपटलावर पुढे येत असले तरी निव्वळ भावनाप्रधान आणि लोकरंजनपर लेखनाकडे कल वाढत जातो आहे हे देखील नोंदवावेसे वाटते. 
       
मी कोण आहे? माझ्याभोवतीचे अफाट, प्रचंड वेगाने पुढे जाणारे जग आणि मी - ह्यांचा परस्पर संबंध कसा आहे? या जीवनाचे मूळ कारण काय आहे?  हे जग कुणी बनवले आहे?  गोष्टी अशा आहेत तर त्या अशा का आहेत? प्रेम, वासना, अहंकार, द्वेष, हिंसा ह्या भावनांचे मानवी परस्परसंबंधांमध्ये काय स्थान आहे? मानवी जीवनातील प्रचंड मोठ्या विरोधाभासाचे मूळ कशात आहे?  असे अनेक प्रश्न आहेत. काही प्रश्न मूलभूत जगाबद्दलचे आहेत - तर काही मानवी मनोव्यापारांबद्दलचे. विचार करण्याची तयारी असलेल्या कुठल्याही माणसाला हे प्रश्न पडतच असतात. ह्या प्रश्नांचा शोध घेण्याचे काम अनेक हजार वर्षांपासून सुरूच आहे. प्रत्येक भाषेतल्या मोठ्या चिंतकांनी, कवींनी ह्या प्रश्नांना हात घातलेला आहे - गझलेतही या प्रश्नांचे, ह्या अन्वेषणाचे प्रतिबिंब अनेकविध रंगांत पडलेले दिसून येते. फारसी गझलेकडून परंपरेने चालत आलेले चिंतनाचे विषय (फिक्र), प्रतिमा- प्रतीके उर्दू गझलेने हातोहात उचलून घेतले. ह्या दृष्टीने उर्दू कवींच्या चिंतनावर फारसी अरबी कवींच्या चिंतनाचा मोठाच पगडा होता - पण त्याहूनही अधिक प्रभाव सूफी विचारधारेतल्या वहदतुल वुजुद - म्हणजे अस्तित्वातल्या एकतेच्या मताचा (ईश्वराचे प्रत्येक गोष्टीत अस्तित्वआहे - किंबहुना ईश्वर हेच एकमेव अस्तित्व) होता हे लक्षात घेतले पाहिजे. सूफींचे हे मत वेदांत आणि बौद्ध तत्वज्ञानाशी काहीसे मिळतेजुळते आहे. मी आणि माझा प्रियकर, माझा देव एकच आहोत ही ती भावना.  महायान बौद्धांचा शून्यवाद; उपनिषदांनी सांगितलेला व्यक्तीचा ब्रम्हणातला विलय; आणि भक्तीपरंपरेतल्या विविध मतांचा इस्लाममधल्या सूफी परंपरेशी हा एकप्रकारे समन्वयच आहे. नागार्जुनाचे शून्य आणि वेदांत्यांचे निर्गुण ब्रम्ह ह्या दोन्ही गोष्टी अंतिमतः मिळत्याजुळत्या आहेत. शून्यवादाला मध्यम मार्ग असे देखील म्हटले जाते. सत्य आणि असत्य अशा दोन टोकांना मान्य न करता वस्तूंच्या निर्भर अस्तित्वास शून्यवादाने मानले आहे (conditional existence) - गोष्टींचा स्वभाव इतर गोष्टींवर अवलंबून असतो. अशी कुठलीच वस्तू नाही जी अन्य वस्तूवर अवलंबून नाही. गोष्टींची परनिर्भरता आणि अवर्णनीयता म्हणजे शून्य- कुठलेच अस्तित्व नसणे म्हणजे शून्य नसून, जे काही आहे ते वर्णनातीत आहे असे शून्यवाद मानतो. शून्य म्ह़णजे काय - तर जे सत्य नाही, असत्य नाही, सत्य आणि असत्य दोन्ही नाही, किंवा सत्य आणि असत्य दोन्ही आहे असेही म्हणता येत नाही.  ह्या अफाट अवर्णनीय अस्तित्वाचे गहन दर्शन गझलेतून सतत येत गेलेले आहे.  एकूण भारतीय दर्शन अफाट आहे. या दर्शनाचा प्रभाव गझलेवर न पडता तर नवलच. वेगवेगळ्या मतांचा, विचारधारांचा समन्वय गझलेतून अनेकविध रूपांनी झाला असल्याचे दिसून येते. ह्या व्यापक अर्थाने बघू जाता गझल ही समन्वयाची कविता आहे असे म्हणावे वाटते - हा समन्वय वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर झालेला आहे. भारतातल्या विविध भाषांना गझलेने आकर्षून घ्यावे ह्यामागे हा समन्वय, जीवनाकडे बघण्याची सहिष्णू आणि उदार दृष्टी कदाचित कारणीभूत असावी; आणि बहुधा हेच कारण असावे की गझलेत इथल्या मातीचा सुगंध दडलेला - रचला - बसला आहे.

मराठी कवितेला चक्रधर, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ अशी प्रदीर्घ परंपरा आहे.  ह्या परंपरेच्या परिवेशात आणि गझलेच्या भाषेत मराठी गझलेत चिंतन यावे ही अपेक्षा रास्त ठरेल. हे चिंतन तत्वज्ञानाप्रमाणे निव्वळ मूलभूत विश्वाचेच असेल असे नाही, तर व्यक्तीच्या अनुभवविश्वाचेही असेल. अट एवढीच, की जे लिहिलं जातंय तो केवळ वृत्तनिर्वाह नसावा - त्यात कविता हवी. मानवी मूल्यांचे, मानवी स्वभावाचे, जीवनातील विरोधाभासांचे चित्रण व्हावे.  मात्रा जुळवण्यासाठी किंवा मोजण्यासाठी कुठलीही प्रतिभा लागत नाही.  वृत्त हे गझलेचे साधन आहे, साध्य नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते.         
             
आता थोडेसे बोलूयात ते समकालीनतेबद्दल. समकालीन म्हणजे आताच्या काळातले, सध्याचे.  याहून अधिक संदर्भ ह्या संज्ञेला जोडण्याची गरज नाही. आताच्या काळात जगणार्‍या लेखकांचे लेखन; आणि गंमत अशी की, की हे लेखन जर मूलगामी असेल - तर ते कुठल्याही काळात समकालीनच ठरेल. मीर, गालिब आणि तुकाराम अगदी सध्याच्या काळात लिहित असल्यासारखे वाटतात. ह्याचे कारण काय असावे? ह्या कवितांचा पट इतका मोठा आहे की त्यात मानवी जीवनाचा प्रचंड आवाका सामावलेला आहे.  हा आवाका सामावून घेण्याच्या प्रयत्नात असणारे हे लेखन मानवी जाणिवेच्या मुळापर्यंत पोचते.  माणूस आणि त्याचा भवताल, त्याचे आयुष्य ह्याची सांगड घालू पहाणारे हे लेखन अनेक पातळ्यांवर फिरताना दिसते.  या स्तरांमध्ये वरवर दिसणारे भावनावेगही येतात आणि रेखीव- घडीव चौकटीच्या पली़कडे असणारे संभ्रम, विरोधाभास, भीती, द्वेष, अहंकार, वासना देखील. एकूण माणूस हा मोठ्या कवितेचा (किंबहुना कुठल्याही कलेचा) केंद्रबिंदू राहिलेला दिसून येतो: 

कद्र नहीं कुछ उस बंदे की

असे जेंव्हा मीर म्हणतो तेंव्हा त्याचा इशारा सामान्य माणसाच्या ओढाताणीकडे आणि विवंचनेकडे असतो. काळ कुठलाही असू देत, सामान्य माणूस नेहमीच हलाखीच्या परिस्थितीत जगत आलेला आहे.  कुठल्याही धर्माने अथवा राजसत्तेने सामान्य माणसाचे जीवन सुकर केलेले दिसून येत नाही. ह्या माणसाचे दु:ख, त्याचा दैनंदिन संघर्ष, त्याला कराव्या लागणार्‍या तडजोडी - आणि एकूणच त्याचे जीवन हा गझलेच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. गझलेतून उमटणारी दु:खाची छटा ही या माणसाच्या दु:खाचे बखान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे हे 'अधिभौतिक' दु:ख आणि दुसरीकडे मानवाच्या अस्तित्वविषयक मूलभूत समस्या - एवढे प्रदीर्घ अंतर पार करणे मोठा कवीच जाणो. मीर जेंव्हा:

वर्ना मैं वही खिल्वती ए राजे निहां हूं

असे म्हणून अस्तित्वाच्या गहन प्रश्नांना सामोरे जातो तेंव्हा ह्या गोष्टीची प्रचीती येते. .
        
एकूण माणूस आणि त्याचे भावविश्व गझलेच्या संवादाचा विषय आहे.  दलित आणि ग्रामीण साहित्यात सामान्य माणसाबद्दलचा जो कळवळा, जी आस्था आणि जे प्रेम दिसून येत - ते साहचर्याने मराठी गझलेत देखील येईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी. पण गझलेतून निव्वळ 'तपशीलीकरणाचे' काम होऊ नये. मीर, गालिब, तुकाराम, कबीर - ह्या महाकवींनी आपल्या काळाचा निव्वळ तपशील मांडण्याचे काम केलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक मराठी कविता - आणि कवितेतले काही 'राजमान्य' प्रवाह हे दुर्दैवाने तपशीलातच गुंतून पडलेले दिसून येतात. जागतिकीकरण आणि महानगरातले विखंडित आयुष्य ह्याच्या परिणामी आलेल्या प्रतिक्रियात्मक स्वरूपाच्या कविता अति-प्रासंगिक ठरून कालबाह्य होताना दिसून येताहेत. कविता नुसतीच प्रतिक्रिया असू शकत नाही. कवितेने  भावनिक प्रतिक्रियेच्या पुढे जाणे अपेक्षित आहे.   
        
कवींची इच्छा असो वा नसो - किंवा गझल लिहिणाऱ्या अनेकांना ह्या गोष्टीची जाणीव असो वा नसो; मराठी गझल ही तथाकथित प्रतिक्रियावादी कविता आणि नाटकी भावकवितेच्या मधोमध उभी आहे.  गझलेने ह्या दोनही प्रवाहांपासून काहीसे दूर राहणे आवश्यक आहे. आम्हाला पाडगावकर - गुलझार- मुनव्वर राणा वळणाची अतिभावनिक - कौटुंबिक अभिव्यक्ती नको आहे - तशीच निव्वळ स्लँगमध्ये लिहिलेली महानगरांची सपाट वर्णने देखील नको आहेत. मराठीत गझल लिहिणाऱ्यांसाठी दलित कविता, साठोत्तरी कविता आणि ग्रामीण कादंबरी हे साहित्यातले महत्वाचे संदर्भ आहेत.  मराठीच काय - ह्या साहित्यातली जीवनानुभुती खरेतर जगातल्या कुठल्याही भाषेसाठी मार्गदर्शक ठरावी इतकी प्रखर आणि अस्सल आहे. साठोत्तरी कवितेने मराठी साहित्याला कृत्रिमतेच्या जोखडातून सोडवले. साठोत्तरी प्रतिभावंतांची समृद्ध शब्दकळा, प्रखर सामाजिक / ऐतिहासिक जाणीव, अभिव्यक्तीमधला आत्यंतिक प्रामाणिकपणा गझलेत आला पाहिजे. थोडक्यात गझलेतल्या आशयाच्या बांधणीसाठी; जीवनाकडे बघण्याच्या व्यापक दृष्टीसाठी आपल्याला मराठीतील उपरोल्लिखित साहित्याकडे वळावे लागेल.
         
एकूण परंपरा आणि आधुनिकता ह्यांचा मेळ गझलेकडून अपेक्षित आहे. आधुनिकता कशातली? - तर व्यक्तीकरणातली, विचार करण्यातली, शेरांची मांडणी करण्यातली. ह्यात निश्चीत नवेपणा असू शकतो. चौकटी बाहेरचा विचार करणे; घासून पुसून सपाट झालेल्या प्रतिमा न वापरणे अशा काही गोष्टी सांगता येतील. लेखनात निव्वळ भावनिकता नको, विचारही हवा. शेरांमधून झटकेदार प्रतिक्रिया देण्यापेक्षा जाणीवेच्या मूळापर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणखी एक गोष्ट – सध्या उर्दू मुशायऱ्यांमधून कधी नव्हे इतकी वाईट गझल पुढे येते आहे - ह्या प्रकारच्या मंचीय गझलेपासून मराठी गझलेने प्रकर्षाने दूर रहावे हे देखील इथे सुचवावेसे वाटते.

गेल्या अंकात गझलेतल्या काही महत्वाच्या अंगांची सविस्तर चर्चा केली. तीच चर्चा इथे पुन्हा करण्याचा उद्देश नाही. ह्यावेळी गझलेचे अर्थगामीत्व आणि अर्थांच्या विविध छ्टांकडे एक नजर टाकूयात.  
       
बरेचदा गझलेतला सूत्रधार आणि स्थिती संदिग्ध असल्याने (बोलणारा तो किंवा ती कोण आहे? प्रसंग काय आहे? पार्श्वभूमी काय आहे?)  अनेकार्थत्वाला भरपूर जागा असते.  शिवाय जे काही बोललं जातं ते बरेचदा सूत्रबद्ध किंवा संकेतांच्या भाषेत सांगितले गेल्याने अर्थाच्या व्यापकतेत आणखी भर पडते. गझलेतल्या ह्या रचनात्मक भागाचे उपयोजन लिहिणारा कसे करतो ह्यावर गझलेची अर्थवत्ता अवलंबून असते.  हे कदाचित वाचायला अनेकांना जड जाईल - पण माझ्या मते संज्ञाप्रवाही लेखनासाठी गझलेत खूपच वाव आहे. हे बारिक कोपरे- कापरे नव्याने लिहिणारे प्रतिभावंत कवी जोखून पाहतील अशी अपेक्षा आहे. शेराचे अर्थगामीत्व समजून घेण्यासाठी जी काही साधने आहेत , त्यामध्ये गझलेची  घडीव शैली काहीसा हातभार लावते. ही घडाई गझलेतल्या शेरांना स्वयंपूर्ण एकक बनवण्यात मदत करत असते. एखादा शेर वेगळा काढून पाहिल्यास तो कवितेसारखा किंवा हायकूसारख संपूर्ण अर्थानुभव उभा करतो - ह्या मागे त्याची शैली आणि रचना देखील आहेच. दुसरे महत्वाचे साधन म्हणजे कवीने वापरलेले सूत्र - मग ती एखादी म्हण असेल, किंवा एखादी विशिष्ट प्रतिमा.  शेरातल्या मूळ विचाराचा विस्तार करण्यात ही साधने हातभार लावतात.  शेराच्या दोन ओळींमधला परस्पर संबंध देखील अर्थनिर्णयात महत्वाचा असतो - बरेचदा पहिल्या ओळीत एखादे प्रतिपादन करून, दुसऱ्या ओळीत तिचे समर्थन किंवा अधिक विवेचन केले जाते. हा क्रम असाच पाहिजे असा कुठेही आग्रह नाही - विपरितविन्यास न्यायाने एखादा शायर ह्याच्या नेमके विरूद्ध ही करू शकतो! अनेकदा ह्या दोन ओळींमधले अंतर जास्त असल्याचे दिसून येते - ह्याचे कारण शेरातली अव्यवस्था नसून गुंता-गुंतीच्या विषयांबद्दल बोलताना काहीसा दुरान्वयाने अर्थ लावण्याचा कवीचा प्रयत्न दिसून येतो.

कल्लोळ, अर्थ आणि भावावस्था हे तीन घटक आहेत {शोरिश, मानी (म'आनी), कैफियत} - जे गझलेच्या शेराला संपूर्णत्व देतात. (कैफियत म्हणजे मूड किंवा एक भावावस्था, मराठीत हा शब्द तक्रार ह्या अर्थाने रूढ होवून बसला आहे). जुन्या उर्दू कवींनी तहदारी आणि पेचदारी अशी दोन साधने वापरलेली दिसतात. तहदारी म्हणजे आशयातली स्तर-दर-स्तर उलगडत जाणारी खोली, तर पेचदारी म्हणजे गुंतागुंत. गालिबने मानी आफरीनी (माना' असे ही म्हटले जाते) असा शब्द वापरलेला आहे.  मानी आफरीनी म्हणजे अर्थाला अधिक संपन्न करणे, अनेक आयाम देणे. गालिब मानी आफरीनीच्या कलेतला मोठाच किमयागार आहे. तो अर्थाला खुलवत नेत-नेत अर्थाचे अक्षरशः बांधकाम करताना दिसून येतो. प्रतिमा, दंतकथा, शब्दांचे विशिष्ट प्रयोग करून तो शेरांमधून अनेक ताण - अनेक पेच निर्माण करतो. नारंग म्हणतात त्याप्रमाणे गालिब वाचताना वाचक एखाद्या 'सौंदर्यशास्त्रीय घटनेतून' गेल्या सारखा अवाक होतो ते ह्या मुळेच.  विचाराची मांडणी आणि तो विचार शब्दांमध्ये लिहिताना होणारी बोलण्याची मांडणी ह्या म्हणाल तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पैकी दुसऱ्या भागात शेर लिहिणाऱ्याची मोठीच कसोटी असते. इथे तुम्ही अर्थाला विस्तारत नेता, वेगवेगळे आयाम देता.  हे करण्यासाठी भाषेची मोठीच जाण हवी. भाषा लिहिता वाचणे एक आणि भाषेची जाण असणे दुसरे. शब्दांचे अर्थ, त्या शब्दांना जोडले गेलेले संदर्भ, शब्दांच्या परस्पर खेळातून (Play) उभे राहणारे अर्थसंघात ह्या गोष्टी शेरांना व्यापक बनवत जातात आणि मग एखादा अर्थ निव्वळ कळवला जात नाही तर एक संपूर्ण अर्थानुभव ह्या रूपात उभा केला जातो. शेरातून निव्वळ एखादी गोष्ट 'कळवणे' म्हणजे खबरिया (बातमीवजा) लिहिणे - अशा लेखनातून अनेकार्थत्वाच्या संभावना राहात नाही, केवळ एकच एक विषय सूचित केला जातो.  ह्या उलट इंशाइया बोलणे - संकेत, आश्चर्य, प्रश्न, आवाहन अशा अनेक अंगांनी समृद्ध असते - आणि ह्या 'वक्तृत्वा'तून (rhetoric) अनेकार्थत्वताच्या शक्यता निर्माण होतात. प्रतिमा, आदिबंध, प्रतिमा अशा आणखी काही गोष्टी सांगता येतील, पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
      
अर्थ (मानी) आणि विषय (मजमून) ह्या दोन गोष्टींमधला फरक ह्या दृष्टीने लक्षात घ्यावा लागेल. गालिबने अर्थांच्या शक्यता शोधण्याच्या प्रयत्नात ज्या अनेक गोष्टी केल्या त्यापैकी एक म्हणजे अत्फ आणि इजाफतींचा वापर. इजाफत म्हणजे काय तर हाले दिल किंवा गमे-दुनिया मधला ‘ए. नाम आणि विशेषणाला जोडणारी, किंवा दोन गोष्टींमधला संबंध सांगणारी सोय. अत्फ म्हणजे 'ओ', दोन गोष्टींना जोडणारा प्रयोग. गालिबने एकानंतर एक अशा वेगवान अत्फ आणि इजाफत वापरलेल्या दिसून येतात (उदा.  कैद-ए-हयात-ओ-बंद-ए-गम). ह्या प्रयोगांमधून तो वाचकावर प्रतिमा चित्रांचा भडिमार करत जातो - आणि अर्थाची अनेक वलये बनवत जातो. इथे रब्त (म्हणजे संबंध) आणि रवानी (म्हणजे प्रवाह, क्वचित वेग) हे दोन अर्थबंध काम करताना दिसून येतात. एकूण एखादा शेर वाचताना जे अर्थ उभे राहतात - त्यामागे अनेक गोष्टी कार्यरत असतात. ह्या सगळ्यांमध्ये लिहिणाऱ्याची जाणिवपूर्वकता असेलच असे मात्र नसते. बरेचदा शब्दांचे तणाव आणि गझलेच्या जमीनीतले उतार चढाव देखील अदृष्य रूपात काम करतात. (गझलेच्या जमीनीचा मी इथे उल्लेख केला आहे आहे कारण कवितेचा आकार - आणि तिचा अर्थ ह्यामधला परस्पर संबंध महत्वाचा असतो).
  
प्रत्येक भाषेची काही वैशिष्ट्ये असतात. अत्फ आणि इजाफत हे उर्दूचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला आपल्या भाषेतले प्रयोग शोधून काढावे लागतील, ज्याने अर्थसंघाताचे काम नीट पार पडेल. जुन्या मराठीत वापरातले काही भाषिक प्रयोग ह्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहेत. गेल्या सात-आठ दशकांमध्ये मराठी पद्य कविता अत्यंत मागे पडलेली दिसून येते. ह्या पद्य कवितेचा विकास, तिचे भाषिक आणि आशयिक संहतीकरण गझलेच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आहे.
        
वर बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे – पण ही सगळी अर्थातच साधने आहेत.  शेवटी कुठल्याही चांगल्या कवितेत अर्थांच्या शेकडो शक्यता मावलेल्या असतात- आणि म्हणूनच- लिहिणाऱ्याची मूळ भूमिका वाचणाराने काढलेल्या अर्थाशी सुसंगत असेल असे आवश्यक नसते. शब्दाकडे निव्वळ संकेत म्हणून पाहिल्या कुठल्याही पाठाची अर्थवत्ता धोक्यात येऊ शकते, पण त्याबद्दल अधिक उहापोह करण्याची इथे आवश्यकता नाही.  शेरातला वर्ण्य विषय आणि शब्दांची केलेली निवड - आणि बोलणाऱ्याचा स्वर ह्यात एक प्रकारचे संतुलन असल्यास एकसंध अर्थनिर्मिती होऊ शकते. हा समतोल भाषेचा आहे, आशयाचा आहे तसाच विचारांचा देखील आहे. गझलेतून सगळेच विषय व्यवस्थित मांडता येतील असे नाही. ह्याबाबतीत कवीकडून थोडे तारतम्य बाळगले जाणे अपेक्षित आहे.  कुठल्या विषयावर शेर लिहावे आणि कुठल्यावर कविता इतकी जागरूकता लिहिणाऱ्याकडे हवी.                         

--

अनंत ढवळे
डब्लीन, ओहायो
२०१७

संदर्भ सूची::
१. उर्दू गझल अँड इंडियन माईंड,  गोपीचंद नारंग (इंग्रजी अनुवाद: निशाद झैदी)
२. गालिब मानी आफरीनी, जदलियाती वजा, शुनीता और शेरीयात, गोपीचंद नारंग
.  शेर--शोर अंगेज (मीर की कविता और भारतीय सौन्दर्यबोध), शम्सुर्रहमान फ़ारूक़ी, भारतीय ज्ञानपीठ
. नेट्स ऑफ अवेरनेस, फ्रांसिस प्रिटश्शे, युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस
.  तत्वमीमांसा एवं ज्ञानमीमांसा, केदारनाथ तिवारी, प्रकाशक मोतीलाल बनारसीदास, दिल्ली
६. कुल्लियात-ए–मीर, मुंशी नवल किशोर प्रेस, लखनऊ
. दीवान-ए-गालिब, ग़ालिब अकादमी, दिल्ली

Friday, April 7, 2017

schrodinger's cat

समुद्र किनार्‍यावर  बसून लाटांचे बनणे - फुटणे बघणे हा  जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच विलक्षणही.  हे चित्र बघणारा अनेक गोष्टींमध्ये हरवून जातो. लाटांचे एकत्र येणे, प्रचंड शक्तीने  किनार्‍याकडे  वाहत वादळत येणे आणि  शेवटी फुटून जाणे; लाटांच्या निर्मीती आणि संपण्यातून निघणारा प्रचंड आवाज.  ही एक अव्याहत प्रक्रीया असते.  पाणी, आवाज आणि गतिमानतेचे सतत आवर्तन.  डोळ्यांच्या  शेवटच्या मर्यादेपर्यंत  पसरलेले अथाह पाणी,  त्याचे निळसर  अथांगपण  आणि बघणार्‍याने ह्या अमर्यादाला  नकळत जोडलेले  वैयक्तिक संदर्भ असा काहीसा प्रकार.  लाटांसोबत आपणही प्रदीर्घ अंतर कापून दूरवर जाऊन पोचतो आहोत  असा आभास होतो.

घेउनी दूर - दूर डोळ्याना
लाट एकेक चालली होती

हे दूर जाणे तसे  निर्हेतुक असते. विचारांची गती इतर कुठल्याही गतीला मागे टाकणारी  गोष्ट आहे.  लाटांसोबत वाहत जाणारे विचार दूरवर न  जातील तर नवलच.   खूप आधी घडून गेलेल्या गोष्टी, बालपणातले पुसट  संदर्भ,  मागे पडून गेलेली गावे, हरवलेले लोक आणि अशा एक ना हजार अनेक वैयक्तिक अनुभवांचे गुंते उलगडत जातात.  हे बघणे आणि हे विचार असूनही नसल्याप्रमाणे असतात.  स्थळकाळाच्या सीमेमध्ये असून नसण्याची, जिवंत असण्याची किंवा नसण्याची अवस्था.   ह्याचे कारण बहुधा निरिक्षकाचे अस्तित्व-भान विसरून जाणे हे असावे.  बघणारा भानावर आला की ही अधे-मध्येची (श्रोडींगरच्या मांजराची 'क्वांटम' अवस्था )  संपून समोर दिसणार्‍या आणि इंद्रियांनी ओळखता येणार्‍या गोष्टी राहून जातात.  बघणारा  आणि बघितले जाणारे बहुधा एकच असावे ह्या विचाराला थेट तडा जातो तो इथेच.  इथे दृष्य आणि दृष्टा अशी सीमा पाडली जाते.
         एकूण बघणार्‍याचे भान ही अवस्थांतर संपवून एकाच अवस्थेत वापस खेचून घेणारी बाब असावी.   एरवी दाटून असलेली एकच-एक महावस्था  बघणार्‍याच्या उपस्थितीने भंग पावते.  परिपूर्ण असलेल्या चित्राला मधोमध चीर पडावी आणि त्याची अनेक शकले  व्हावीत असे काहीतरी.    निसर्गाच्या अपरिमेय पटावर माणसाचे  हे अवस्थांतर आणि ही  तगमग  ठरलेलीच असते.  वस्तूंचे असणे , नसणे आणि  सापेक्षतेच्या अनेक सिध्दांतांची उजळणी घडवून आणणारे हे अनुभव असावेत. समुद्र ,  डोंगरांची  उत्तुंग शिखरे, दर्‍या- खोर्‍या, घनदाट जंगले  माणसाला खेचून घेतात - ते बहुतेक ह्याच अनुभवांच्या मुशीतून जाण्यासाठी.

 थेंबाचा समुद्र होण्याचे काय  बखान
आर- पार पसरून  राहिलेला विस्तार

थेंबाचा समुद्र होणे  आणि समुद्राच्या अफाट विस्तारात त्याचा पुन्हा कणामध्ये विलय होणे,   हा अनुभव प्रत्येकासाठी नवीन असला तरी मानवी इतिहासाइतकाच  तो प्राचीन आहे.  पहिल्यांदा अनुभवणार्‍याच्या कुतुहलाइतपतच  त्याची नवलाई.

लेख आणि गझल
-  अनंत ढवळे

Thursday, March 30, 2017

गझल - काही नोंदी

'समकालीन गझल' मधला लेख - इथे पुन्हा देतो आहे. :
---
गझल : काही नोंदी
---
गझलेची व्याख्या काय असावी ह्याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसून येते. माझ्या मते एखाद्या साहित्यविधेची सरधोपट व्याख्या करणे शक्य नाही. तसेच ते अत्यावश्यक देखील नाही. सुरुवातीच्या काळातल्या व्याख्या बघितल्या तर स्त्रीसोबत केलेला संवाद किंवा स्त्रियांबद्द्ल बोलणे म्हणजे गझल; हरिणाच्या शोक आणि भयग्रस्त हृदयातला हुंकार म्हणजे गझल अशी काही वर्णने सापडतात. पण गेल्या साताठशे वर्षांचा गझलेचा प्रवास बघता, ह्या व्याख्यांची व्याप्ती गझलेने केंव्हाच पार केलेली आहे असे लक्षात येते. त्यामुळे ह्या व्याख्या अत्यंत मर्यादित आहेत असे म्हणावे वाटते. खरे तर गझलेला विषयांची मर्यादा नाही. मानवी जीवन आणि संवेदनांचे जग जितके विशाल आहे, तितकीच गझलेची व्याप्तीदेखील. गझलेला निव्वळ प्रेमकविता म्हणणे हे तिच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा खून करण्यासारखे आहे असे आहे प्रसिद्ध उर्दू समीक्षक डॉ. इबादत बरेलवी ह्यांनी म्हटले आहे. गझलेत जसे अमूर्ताचे चिंतन आहे तसे अनेक ऐतिहासिक, सामजिक, मनोदैहिक विषयही आहेत. थोडक्यात गझलेच्या चिंतनाचे विषय हे माणसाच्या जीवनाप्रमाणेच अमर्याद आहेत.
तगज्जुल (म्हणजे भाषिक साधने) आणि तखैय्युल (म्हणजे प्रातिभिक साधने) ह्या दोन प्रमुख घटकांचा परिपाक असलेली, वृत्त-काफियादिकांचे काही विशिष्ट नियम पाळून लिहिलेली घाटनिष्ठ आणि संवादी कविता म्हणजे गझल असे ढोबळ मानाने म्हणता येईल. भाषिक साधने आणि विचार (किंवा) आशय ह्यांना मर्यादा नाहीत. जसजशी गझल लिहिली जाईल, तसतसा ह्या संज्ञांचा विकास होत जाईल. शेर हा गझलेच्या घाटाचा प्रमुख घटक. गझलेची म्हणून जी काही वैशिष्ट्ये आहेत ती शेराची देखील आहेत. गझलेतला शेर हा एक स्वतंत्र आणि संपूर्ण विचारसंकुल असतो असे फिराक गोरखपुरी म्हणतात. कवीचे वक्तव्य, त्याची अनुभुती, त्या अनुभवातली तीव्रता - उत्कटता, आवाहकत्व, भाषेचे आणि प्रतिमांचे संघटन ह्या सगळ्यांचा परिपाक होऊन एक अंतर्बाह्य एकजीव असे संकुल जेव्हा उभे राह्ते - तेंव्हा खऱ्या अर्थाने चांगला शेर उभा राहतो. आशय आणि व्यक्तीकरणामध्ये एक प्रकारची समतानता आणि संतुलन हे शेराचे प्रमुख वैशिष्ट्य. शेर संपल्यानंतर त्यातल्या अर्थ आणि जाणिवेच्या अनेक छटा वाचणाऱ्याच्या मनात उमटत राहतात. गझलेचा शेर हा शेर संपल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होते असे बशर नवाज ह्यांनी म्हटले आहे ते यामुळेच. चांगला शेर हा बरेचदा आपल्या अपूर्वतेने किंवा ताजेपणामुळे देखील लक्षात राहतो - भाषा, शैली आणि आशयाच्या नाविन्यामुळे एरवी लक्षात न आलेली गोष्ट पुढे आणली जाते. निव्वळ विरोधाभास, धक्कातंत्र, कलाटणी अथवा चमत्कृती ही शेरांची वैशिष्ट्ये नाहीत ही गोष्ट इथे लक्षात यावी. गालिबचे शेर जनमानसात कायमचे कोरले गेले आहेत, ते त्यातल्या बौद्धिक प्रतिमा, अंगभूत पेच, अत्यंत समृद्ध शब्दकळा आणि शैलीमुळे - विरोधाभास, चंचलता किंवा हेलकाव्यामुळे नाहीत. चांगल्या शेरांचे जे अनेक गुण सांगितले जातात त्यात अनेकार्थत्व (वरकरणी जो अर्थ वाटतो आहे त्यापेक्षा वेगळा अर्थ असणे, अनेक अर्थ निघणे); शब्दौचित्य (उचित आणि अर्थाशी योग्य संबंध सिद्ध करणारे शब्द वापरणे); भाषासौकर्य (बोलण्यासारखी सहज भाषा वापरणे) इ. उल्लेखनीय आहेत.
गझल ही घाटनिष्ठ रचना आहे असे आपण जेंव्हा म्हणतो, तेंव्हा त्यात एक प्रकारचे सौष्ठव, घडाई किंवा बांधणी अपेक्षित असते. कुठल्याही पद्य कवितेत, मग ती साधी ओवी का असेना, एक विशिष्ट रचना दिसून येते - ही रचना गझलेत थोडी जास्त उठावदार असते इतकेच. गझलेच्या पारंपरिक टीकाकारांना ह्या रचनेबद्दल, तिच्यातल्या बंधनांबद्दल नेहमीच आक्षेप राहिलेला आहे. इतके क्लिष्ट नियम असलेली कविता विचाराचा अथवा आशयाचा नीट विकास होवू देणे शक्य नाही असा काहीसा हा आक्षेप असतो. गझलेत मोठ्या समजल्या जाणाऱ्या कवींच्या गझलांकडे बघितल्यास ह्या बंदिस्त घाटातूनही अत्यंत गहन आशय आणि क्लिष्ट विचार उतरून आलेली दिसून येतात. शिवाय गझलेच्या रुपात आल्याने, त्या गहन विषयांमध्येदेखील एक प्रकारची सहजता आणि संस्मरणीयता आलेली आहे हे ही लक्षात येते. मीर तकी मीर आणि गालिब ह्यांचे अनेक शेर या गोष्टीचे प्रमाण आहेत. या दोन कवींचे शेर बरेचदा आपल्या अर्थाआधी आपल्या रचनासौंदर्याने वाचणाऱ्याला आकर्षून घेतात. थोडेसे वेगळ्या शब्दांत बोलायचे झाल्यास गझलेच्या बंधनांमध्येच गझलेचे सौंदर्यदेखील दडलेले आहे. शब्दांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, लय, नाद, जाणिवेची तीव्रता ह्या रचनावैशिष्ट्यांमुळे गझलेतील अनुभवाची संघटना बनत, उलगडत आणि विकसित होत जाते.
साहित्याच्या प्रत्येक विधेची आपली अशी बलस्थाने असतात, तशाच मर्यादाही असतात. गझलेलाही आपल्या अंगभूत मर्यादा आहेतच - त्या नाकारण्याचे कारण नाही. मुक्त कवितेत विचार खुलवत नेण्यासाठी भरपूर जागा असते. गझलेत मात्र दोन ओळींचाच अवकाश असतो. दरवेळी कवीला आपला आशय शेरांच्या बंदिस्त घाटातून समर्थपणे पेलवेलच असे नाही. पण ह्या संक्षिप्ततेमुळे गझलेच्या शेरामधून येणारा आशय अधिक गडद, सघन होऊन येतो हे ही लक्षात घेतले पाहिजे.
आता गझलेच्या भाषिक साधनांबद्दल थोडेसे बोलू. वर म्हटल्याप्रमाणे तगज्जुल हा गझलेतला महत्वाचा घटक. ह्या संज्ञेबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज पसरलेले आहेत. तगज्जुल म्हणजे 'गझलीयत' आहे असेही सर्रास बोलले जाते. वास्तविक गझलीयत असा काही प्रकार नसतो. शेरांमध्ये चमत्कृती असावी, हेलकावा असावा, शेर गोटीबंद असावा, शेरातून काही विरोधाभासात्मक आले पाहिजे आणि हे घटक शेरात नसले, तर त्या शेरात गझलीयत नसते - असे अनेक गैरसमज मराठीत वर्षानुवर्ष पसरून राहिलेले आहेत. खरंतर विरोधाभास, चमत्कृती इ. लक्षणे मुशायऱ्यातून हमखास गाजणाऱ्या पण उर्दू साहित्यात नेहमीच गौण मानल्या गेलेल्या टाळीबाज गझलांची आहेत. थोडक्यात तगज्जुल या संज्ञेचा गझलीयत सारख्या काल्पनिक गोष्टींशी काहीएक संबंध नाही. तगज्जुल म्हणजे गझलेची भाषिक साधने - ह्यात प्रतिमा, प्रतिके, दंतकथा, वाक् प्रचार, उपमा इ.चा समावेश होतो. उर्दू गझलेपुरते पाहू गेल्यास जाम, सुराही, मैखाना, साकी, गुल, बुलबुल, लैला मजनू, शीरी फरहाद ह्यांच्या कथा इ. अनेक गोष्टींचा समावेश होतो. अर्थातच काळासोबत ही प्रतिमा प्रतिके बदलत गेलेली आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक उर्दू गझलेची प्रतिमासृष्टी ही चिंतनपरक आहे; शिवाय दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टीही तिच्यात समाविष्ट झालेल्या आहेत. एकोणिसाव्या शतकात – विशेषत: तरक्कीपसंद (प्रगतीशील) कवींच्या गझलांमधून ह्या प्रतिमासृष्टीचा विशेष विस्तार झालेला दिसून येतो . डॉ शाहपार रसूल यानी म्हटल्याप्रमाणे प्रगतीशील उर्दू कवींनी आयुष्याच्या फैलावत जाणाऱ्या परिदृष्याला आपल्या अभिव्यक्तीचा पाया मानले आहे.
मराठी गझलेची ही साधने किंवा प्रतिमाविश्व सुरुवातीच्या काळात स्वाभाविकपणे मर्यादितच होते. मी विरुद्ध जग हा काल्पनिक संघर्ष आणि ह्या संघर्षांच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रतिमा आणि काहीशा आग्रही - अनेकवेळा आक्रमक अशा शैलीचा बोलबोला होता. ख्ररं तर कवीने कुठल्या प्रकारे लिहावे, संयत लिहावे की आक्रमक लिहावे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे असे म्हणता येते. पण गझलेचा, विशेषतः उर्दू गझलेचा इतिहास बघता, ह्या गझलेत मोठे किंवा महत्वाचे मानले गेलेले लेखन बघता - गझलेचा स्वर हा संयत असतो असेच म्हणावे लागेल. गझलेच्या शेरांमधली आक्रमकता क्वचितप्रसंगी आपल्या वेगळेपणामुळे आकर्षक वाटत असली तरी ती गझलेचा स्थायीभाव होऊ शकत नाही. हीच गोष्ट चमत्कृती,विरोधाभास ई. बद्दलही म्हणता येईल.
गझल आपण उर्दूकडून घेतली - त्याबद्दल आपण उर्दू भाषेचे आणि अर्थातच सुरेश भटांचे ऋणी आहोत. गेल्या चार शतकांमध्ये उर्दूत प्रचंड मोठ्या प्रमाणात गझल लिहिली गेलेली आहे. तिच्यात अनेक प्रवाह, शाखा आणि मत-मतांतरे आहेत. पैकी मराठीला दिल्ली स्कूलची उर्दू गझल - विशेषत: मीर आणि गालिब ह्यांच्या गझला जास्त जवळच्या वाटतात ही वस्तुस्थिती आहे. चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथादिकांच्या अध्यात्म आणि भक्तीच्या रंगात रंगलेले मराठी मन; समाजसुधारकांच्या प्रखर सामाजिकतेत विकसित आणि विस्तारीत झालेली मराठी मनाची सामूहिक जाणीव - लखनवी वळणाच्या बनावटी आणि चंचल गझलांच्या (ज्याना उर्दूतही विशेष महत्वाचे मानले जात नाही) वाटेने जाणे कठीणच आहे. प्रत्येक भाषेचा आपला एक स्वभाव, परंपरा, इतिहास आणि कल असतो. मराठी गझल ही उर्दू गझलेची थेट प्रतिकृती असणार नाही - तशी अपेक्षा करणे देखील चुकीचे ठरेल. तिचे स्वतःचे व्यक्तित्व आणि स्वभाव असेल.
गझल ह्या विधेचा व्यापक पातळीवर विचार करू जाता मराठीत (आणि इतर भाषांमधून) जे गझल लेखन होते आहे - त्याने गझल उत्तरोत्तर समृद्ध होते आहे. मराठीतले समाजजीवन, अध्यात्म, ग्रामीण आणि नागर प्रतिमा ह्या गोष्टी मराठी भाषेची गझलेला देणच आहे. मराठी गझलेबद्दल वाढलेली उत्कंठा ही उर्दू गझलेला देखील पोषक ठरते आहे. अनेक उर्दू कवी महाराष्ट्रात ओळखले, वाचले आणि चर्चिले जातात. ही आनंद आणि समाधान देणारी गोष्ट आहे; साहित्य व्यवहाराने माणसे जवळ यावीत, भाषांमधले संवाद वाढावेत हे एका उदार आणि सहिष्णू अशा सामाजिक, साहित्यिक मानसिकतेचे द्योतक आहे.
मराठी कवितेवर वारकरी साहित्याचा प्रभाव स्पष्ट आहे. किंबहुना आधुनिक मराठीच्या निर्मितीत ह्या परंपरेचा, विशेषत: तुकारामाचा मोठाच हिस्सा आहे. तुकारामाची भाषा रोखठोक आहे म्हणून आपणही रोखठोक गझल लिहिली पाहिजे हे गृहितक मात्र मुळातच चुकीचे आहे. तुकारामाची कविता अत्यंत गहन आणि एखाद्या महासागराप्रमाणे विशाल आहे. तुकारामातले काही निवडक सामाजिक अभंग म्हणजेच तुकाराम आहे असे समजून लिहिणे अयोग्य ठरेल. मराठी साहित्य, मराठी परंपरा आत्मसात करून - गझलेच्या मूळ अक्षापासून दूर न जाता आपल्याला गझल लिहिली पाहिजे. नुसतेच वृत्त लिहिता आले आणि काफिया रदीफ समजला म्हणजे गझल समजली असे होत नाही. गझलेची लय, तिचा घाट, शेरांमधले अंतर्विरोधात्मक पेच इ. समजून घेणे आवश्यक आहे.
गझलेचा सूर संयत असतो; पाण्याचा एखादा प्रवाह संथ वाहत जावा - एकसंध गतीने, तशी गझल आपल्या विचारांसहित पुढे जात असते. कुठलीही कविता ही मानवी जाणिवांची अभिव्यक्ती असते आणि जिथे जाणीवा येतात - तिथे एक गोंधळ आणि असमतोल असतोच. मात्र हा गोंधळ देखील एका 'एकसंधत्वात' आणि एका प्रतलात गझलेतून उमटताना दिसून येतो. एकीकडे विचारांचा, जाणिवांचा हा गोंधळ, आणि दुसरीकडे गझलेची संथ लय - हा समतोल साधणं कठीण असलं, तरी अशक्य नक्कीच नाही. गझलेची ही लय समजून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी मीरच्या गझलांचा निश्चीत अभ्यास करावा असे सुचवावेसे वाटते.
गेल्या दिडेक दशकात झालेले मराठी गझल लेखन मात्र ह्या अंगाने खूपच चांगले उतरलेले आहे असे आवर्जून नमूद करावेसे वाटते. जसे जसे नवनवीन कवी गझल लिहू लागले आहेत, तसतसे गझलेचे प्रतिमाविश्वही विस्तारत जाते आहे. मराठी भाषेचा स्वभाव, तिची वळणे, दैनंदिन बोलीभाषेतले वाक्प्रचार आणि म्हणी, शब्दप्रयोग, ग्रामीण भाषेचे सौंदर्य आता गझलेत खऱ्या अर्थाने येऊ लागले आहे, बहरू लागले आहे. आंतरजालामुळे कवींना उपलब्ध झालेली विविध साधने आणि गझलेचा झालेला प्रसार हे ह्या या बदलामागचे मुख्य कारण आहे हे देखील स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. मराठी गझलेची ही भाषिक साधने अशीच विकसित आणि विस्तारीत होत राहोत ही अपेक्षा आहे.
आता थोडेसे बोलूत ते 'तखय्युल' ह्या संज्ञेबद्दल. खयाल म्हणजे विचार ह्या संज्ञेपासून बनलेला हा शब्द आहे. ह्या शब्दाच्या निव्वळ शब्दकोशीय अर्थाच्या पलीकडे जाऊन कवीची प्रतिभा विचार, कल्पना, आशय असे काही व्यापक अर्थ आपण घेऊ शकतो. एकूण कवीच्या प्रतिभेतून गझलेत चित्रित होणारी जी विचारव्यूहे आहेत त्याला तखैयुल म्हणता येईल. इथे गझल लिहिणाऱ्या कवीचा खरा कस लागतो. चांगले शेर चांगले का वाटतात, ह्या मागे अनेक कारणे असली तरी त्या शेरामधून व्यक्त झालेली लिहिणाऱ्याची प्रतिभा हे एक मोठेच कारण असते. मानवी जीवनाचा परिवेश बदलत गेलेला असला तरी जीवन तेच आहे; मूलभूत विषय आणि पेच तेच आहेत. आपल्या प्रतिभेतून कवीने घेतलेला मानवी जीवनाचा शोध ही कदाचित कुठल्याही गझलेची (अथवा कवितेची) सगळ्यात मोठी उपलब्धी असते. कवीची प्रतिभा ही त्याचे वाचन, चिंतन मननातून झालेले संस्कार, त्याचे निरिक्षण, स्वतःचे आणि इतरांचे अनुभव, त्याच्या कळत नकळत तयार झालेल्या भूमिका, त्याच्या आधी अस्तित्वात असलेली कवितेची परंपरा इ. अनेक गोष्टींच्या परिपाकातून विकसित होत असते. ही प्रतिभा किंवा हा तखैय्युल, कवीची गझलेतून उतरणारी छवीदेखील असते. ही प्रातिभिक साधने आणि भाषेच्या मिश्रणातून कवीची शैली निर्माण होत असावी असे मानण्यास भरपूर वाव आहे.
गझल ही 'स्व'च्या शोधाची आत्मनिष्ठ कविता आहे, पण ह्या 'स्व' ला आपल्या परिवेशापासून, परंपरा, इतिहास आणि समाजापासून वेगळे करून पाहणे शक्य नाही. सुरुवातीच्या काळातली मराठी गझल ही आत्मनिष्ठ कमी आणि आत्मकेंद्रित जास्त होती. कालानुरूप हे चित्र बदलले; किंबहुना माझ्या पिढीतल्या गझलेने ते जाणीवपूर्वक बदलवून आणले - ते आणखी बदलणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात जगणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसाचे युगभान, समूहभान, त्याच्या दैनंदिन जीवनातले संघर्ष, अतिप्रगत तंत्रज्ञानामुळे झालेले भंजन, खेड्यांचे कोसळत जाणे, शहरांची बकाली, बदलत चाललेली कुटुंबव्यवस्था, दिवसेंदिवस वाढत चाललेले धार्मिक संघर्ष - आणि ह्या सर्वांच्या परिणामी मानवी जीवनात आलेले दुभंगलेपण - ह्या विषयांचा वेध घेणारी; ह्या विषयांवर गझलेच्या भाषेत बोलणारी गझल अधिकाधिक प्रकर्षाने पुढे आली पाहिजे. पण असे करताना निव्वळ ह्या विषयांचे सरधोपट बातमीवजा वर्णन करून चालणार नाही. कालानुरूप होत जाणारे बदल, सामाजिक तपशील जसेच्या तसे टिपणे हे कवितेचे काम नाही. त्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगाचा मानवी मनावर काय परिणाम होतो आहे; त्याच्या अस्तित्वलक्ष्यी प्रेरणा, महत्वाकांक्षा, भीती, प्रेमभावना, वासना; समूहाशी असलेले त्याचे नाते इ. गोष्टींचा विचार गझलेला करावा लागेल.
उर्दू गझलेत अनेक शतके प्रेमाचा बोलबाला राहिलेला आहे. इतका की गझल म्हणजे एक प्रकारची प्रेमकविताच आहे असेही म्हटले जाते. हे अगदीच मर्यादित अर्थाने खरेही आहे. गझलेच्या प्रारंभिक शायरांमध्ये अनेक सूफी संत होते. ह्या संतांनी आपल्या ईश्वराला उद्देशून अनेक प्रेमकविता लिहिल्या आहेत. अमिर खुसरौचे उदाहरण ह्या अनुषंगाने लक्षात घेता येईल. खुसरौच्या गझलेतला पिया म्हणजे त्याचा ईश्वर आहे. आपल्याकडे भक्ती संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातले प्रेम; किंवा तुकाराम ज्याला 'आनंद' म्हणतो तीच ही भावना आहे. पुढे मीर आणि गालिबच्या गझलांमधून हे चिंतन निव्वळ प्रेमभावनेपुरते मर्यादित न राहता एकंदर मानवी जीवन आणि आयुष्याचा ठाव घेताना दिसून येते. विशेषता: मीरच्या गझलांची भाषा ही वरकरणी बाह्य प्रेमाची असली, तरी त्याची प्रवृत्ती ही प्रेमातला 'हकीकी' म्हणजे 'सत' भाव शोधण्याकडेच असल्याची दिसून येते. एकूणच उर्दू गझलेतल्या प्रेमाला बरेचदा चिंतनाची डूब असते असे लक्षात येते.
अर्थातच उर्दू शायरांनी हे जे चिंतन केले आहे, ते प्रेमाच्या भाषेत - गझलेचे सौंदर्यभान राखत, तिचे 'कवितापण' जपत केलेले आहे हे ही लक्षात घेतले पाहिजे. गझल प्रेमाबद्दल, आयुष्याबद्दल चिंतन करते, पण ती काही थेट आध्यात्मिक कविता अथवा भक्तीगीत नसते; तसेच ती रुक्ष दर्शनशास्त्रही नसते हा तरल भेद विसरता कामा नये. थेट भक्तीपर लिहिणे किंवा तत्वचिंतनातला एखादा सिद्धांत जसाच्या तसा उचलून गझलेच्या शेरात टाकणे म्हणजे गझलेच्या मूळ अक्षापासून दूर जाण्यासारखेच आहे. गझलेतला मानवी स्पर्श हरवता नये. आपल्या चिंतनपरकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्ली स्कूलमधल्या कवींना देखील मानवी भाव भावनांवर, प्रेमावर भरपूर लिहिलेले आहे - त्यांच्या अनेक गझला ह्या प्रेमातली आर्तता, प्रेयसीच्या सौंदर्याची वर्णने, विरहातली व्याकुळता इ. विषयांवर बोलताना दिसून येतात (इथे बोलणे हा गझलेच्या संवादी असण्याकडे केलेला इशारा आहे). गालिबचे अनेक शेर प्रेमभावनेतल्या अनेक बारिकसारिक खाचाखोचांबद्दल बरेचदा मानसशास्त्रीय पातळीवरून विचार करताना दिसून येतात.
ह्या सगळ्या परिवेशात जेंव्हा आपण मराठी गझलेचे चिंतन करू जातो - तेंव्हा काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे मराठी कवितेची परंपरा, मराठी जनमानसाचा एकून स्वभाव आणि तिसरा, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सध्याच्या काळात आणि साहित्यात होत असलेली प्रचंड स्थित्यंतरे. मराठी कवितेची परंपरा पाहू जाता गझल ही तुलनेने अद्यापही नवी आहे असे म्हणावे लागेल. उर्दू किंवा फारसी इतकी जुनी मराठी गझलेची परंपरा नाही. ह्याचे दोन परिणाम होतात. एक परिणाम लिहिणाऱ्यांवर होतो, तो असा की त्यांच्यापुढे संदर्भासाठी विशेष सामग्री उपलब्ध नसते. दुसरा परिणाम होतो तो तत्कालीन साहित्यिक समज आणि समीक्षेवर. तुलनेने नव्या आणि दुसऱ्या एखाद्या भाषेतील परंपरेशी जवळीक सांगणाऱ्या साहित्य विधेकडे समीक्षक आणि अभ्यासक सपशेल दुर्लक्ष करतात. मराठी गझलेसोबत सध्या हेच होते आहे. वास्तविक पहाता मराठी आणि उर्दू ह्या भाषांचा संबंध अतिशय जुना आहे. उर्दूतून मराठीत आलेल्या हजारो शब्दांची उदाहरणे देता येतील. शिवाय मराठीतून दखनी उर्दूत गेलेले शब्दही अनेक आहेत. गालिबच्या अनेक उर्दू शेरांचा प्रभाव मराठीतल्या गद्यपद्य लेखनावर दिसून येतो. असे असताना केवळ उर्दूतून आलेली आहे म्हणून गझलेकडे दुर्लक्ष करणे अयोग्य तर आहेच, पण अत्यंत कोत्या मानसिकतेचे द्योतकही आहे. गझलेवर अधूनमधून होणारी द्वेषमूलक टीकेतून ही मानसिकता वेळोवेळी दिसून येत असते. साठोत्तरी पिढीतल्या काही समीक्षकांनी सुरुवातीच्या काळात गझलेवर केलेली विखारी टीका अजूनही गझलेचे अतोनात नुकसान करते आहे. नंतरच्या समीक्षक अभ्यासकांनी ह्या टीकेचे निव्वळ अनुसरण करत गझलेला दुर्लक्षित करणे सुरूच ठेवलेले आहे. असो.
गेल्या दहा पंधरा वर्षांत लिहिली गेलेली मराठी गझल ही मराठीतली अत्यंत महत्वाची कविता आहे. ही गझल कशी आहे ? तर ती कुठल्याही 'उत्तरी' गटात न मोडणारी; शहरी, ग्रामीण, महानगरी अशा कुठल्याही बेगडी विद्यापीठीय संज्ञांमध्ये न अडकलेली; तपशील आणि माहितीच्या जोखडातून कवितेला सोडवून माणसाला आणि त्याच्या आयुष्याला आपल्या सर्जनाच्या केंद्रस्थानी ठेवणारी आहे. प्रतिभेच्या आणि चिंतनाच्या सीमांना आवाहने देणारी; भाषेला तिच्या समृद्ध वारशाचा पुनः प्रत्यय देणारी; बहुतांच्या जीवन आणि भावविश्वाचे प्रतिनिधित्व करणारी ही विधा मराठी साहित्यातले एक अत्यंत महत्वाचे आणि समृद्ध दालन आहे. मराठी कवितेच्या अभ्यासकांनी, समीक्षकांनी आणि साहित्यिकसंस्थांनी ह्या गझलेची योग्य ती दखल घेणे आणि गझल लिहिणाऱ्या कवींना यथोचित स्थान देणे अत्यंत आवश्यक आहे. साहित्य अकादेमीने प्रातिनिधिक गझल संग्रह प्रकाशित केला ही आनंदाची बाब आहे. मात्र ह्यासारखे अधिकाधिक उपक्रम यापुढेही होत राहणे गरजेचे आहे. मराठी जनमानसाने एवढ्या प्रेमाने आणि आत्मियतेने जवळ केलेली ही विधा, समीक्षकांच्या अनास्थेमुळे जर साहित्यात दुर्लक्षित राहणार असेल तर ती एक मोठी विडंबनाच ठरेल.
अनंत ढवळे
पुणे, सप्टेंबर २०१६
anantdhavale@gmail.com
-------------------
संदर्भ सूची:-
१. डॉ.इबादत बरेलवी, गज़ल और मुताला ए गज़ल, अंजुमन तरक़्क़ी उर्दू पाकिस्तान, १९५५.
२. शम्सुर्रहमान फ़ारूक़ी, मीर की कविता और भारतीय सौन्दर्यबोध (शेर-ए-शोर अंगेज का हिन्दी अनुवाद), भारतीय ज्ञानपीठ, २०१४.
 ३. अग्निएस्झ्का कुक्झ्जेविक्क्झ फ्रास, द बिल्वड अँड द लवर - लव इन क्लासिकल उर्दू गझल, क्रॅको इन्डोलॉजिकल स्टडीज, व्हॉल्युम १२, २०१०
४. फ़िराक़ गोरखपुरी, उर्दू की इश्क़िया शायरी, वाणी प्रकाशन, २०१४
५. डॉ शाहपार रसूल ‘फिक्रो तहकी़क’ ह्या मासिकाचा नयी गज़ल विशेषांक
 ६. मराठी ग़ज़ल : अर्धशतकाचा प्रवास, संपादक: राम पंडित, साहित्य अकादेमी, २०१४
७. मीर, संपादक: अनंत ढवळे, हिंडोल प्रकाशन औरंगाबाद, २००६
ॠणनिर्देश :
ज्येष्ठ उर्दू कवी आणि विचारवंत स्व. बशर नवाझ साहेब; प्रसिद्ध उर्दू कवी आणि अनुवादक श्री अस्लम मिर्झा; ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राम पंडीत आणि इतर अनेक कवी, अभ्यासक मित्र

Wednesday, September 14, 2016

बेरंग - भाग १

कथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा.

--
बेरंग
--
आता हा नवा अधिकारी आल्यापासून सगळ्यांची हालत खराब झाली आहे, तो पैसे खाऊ देत नाही, स्वतः ही खात नाही. सुरुवातीला आपण याच्याशी मैत्री करून पाहिली. आपल्या लायनीत घ्यायचा प्रयत्न केला, पण काही फायदा नाही. तसा वागायला बोलायला बरा आहे. भरपूर शिकलेला आहे. तालेवार घरातला आहे. ह्याचे वडील देखील अधिकारीच होते, थेट कॅबिनेट सेक्रेटरीच. चिक्कार पैसा धरून आहेत. शिवाय दिसतातही नीटनेटके, श्रीमंत. काही लोक दिसतातच पैसेवाले, चकचकीत. हा त्यातलाच आहे. हे असं इतरानाही दिसतं का हे तपासून पहायला पाहिजे. एकदा चंद्याला विचारू. भडवा आपल्यासारखाच आहे. यथातथा परिस्थितीतून आलेला. पण बिनधास्त असतो. मौजमजा करतो. जोक सांगतो सगळ्याना. जिथे जाईल तिथे पॉप्युलर होतो. शिवाय बायाना घुलवण्यात तर एक नंबर आहे. चंद्या वागायला फारच नैसर्गिक आहे. आपल्यासारखा नाही. आपण मनमोकळे बोलत नाही अशी तक्रार सगळ्यांचीच असते. साली सवयच नाही . आपण फक्त पिल्यावर मोकळ ढाकळं बोलू शकतो. हा कदाचित आपला न्यूनगंड असावा.आपल्या डोक्यात काही खेळ सुरू असतो, आणि आपण त्या खेळात गळ्यापर्यंत बुडलेले. मध्येच कुणीतरी काही विचारतो आणि आपल्या खेळात खंड पडतो. मग आपण काहीतरी बोलून वेळ मारून नेतो.चंद्या आपल्याहून खूपच बरा आणि चतुर.आपण आणि चंद्या दोघानी मिळून या नव्या साहेबाला समजावयाचा बराच प्रयत्न केला. आपण जे करतो ते करप्शन नाही, तर कट प्रॅक्टीस आहे. डॉक्टर लोक करतात तशी. आपण फक्त कमीशन घेतो, पण काम चोख होईल याची खातरजमा करतोच. आपल्या नियंत्रणाखाली बनलेल्या सुरगाव रस्त्याचा दाखला दिला. म्हटलो गाडीत बसून चहा पीत जा. बशीतून एक थेंब सांडायचा नाही एवढा मुलायम रस्ता आहे. एक खड्डा नाही त्यावर. गालाशेठ आपला दोस्त कंत्राटदार आहे. पैसा भरवतो इथून तिथून सगळ्याना पण काम साला चोख बजावतो. पण साहेब बधला नाही, म्हटला भ्रष्टाचार देशाला संपवून टाकेल एक दिवस. या विधानावर चंद्या बावळटासारखा फिदी फिदी हसला होता. आपण नंतर झापला त्याला. म्हटलो तू साला चुतिया आहेस. कुणासमोर काय बोलायचं ते कळत नाही तुला. आपलीच गल्ली असल्यासारखा बरळत सुटतो. तर म्हटला झिगझिग करू नकोस जास्ती. तो साहेब बधेना झाला म्हणून तू वैतागला आहेस.

                 चंद्याच्या बोलण्यात तसं तथ्य होतं. गेले दोनेक महिने झालेत कंत्राटदार घाबरून फिरकतच नाहीत ऑफिसकडे. संध्याकाळी भेटतात, दारू बिरू पाजतात. सोबती कोंबडी, मटण. दारूही स्कॉच. म्हणतात या साहेबाचं करा काही तरी. आपण म्हणतो तो आपल्यापेक्षा वरच्या हुद्द्यावर आहे. शिवाय त्याच्या बापाची सर्वत्र ओळख. भडवा कॅबिनेट सेक्रेटरी होता. त्याने खा खा खाल्लं त्याच्या काळात पण पोराला वाटतं आपला बाप भली इमानदार. आपण काय झाट वाकडं करू शकत नाही त्याचं. आता तो आहे तोवर बसा उगी शांत. पण कंत्राटदाराची जात मोठी चिकट.कामाच्या माणसाला पटवण्यासाठी वाटेल ते करतात. पार्ट्या, बाया न वाट्टेल ते. एवढी सरबराई करतात की डोक्यात हवा जाते. आपण कुणीतरी मोठे आहोत असं वाटायला लागतं. गेल्या वर्षी आपण एक मोठं टेंडर काढल. त्यात गाडी आली. इथल घर झालं. पुढच्या दोनतीन टेंडरात पुण्यात फ्लॅट झाला. अजून आपलं लग्न व्हायचं न त्या आधीच आपली तीन तीन घरं. लोकांचं एकही होत नाही. साला एके काळी आपली ऐपत नव्हती कोल्ड्रिंक प्यायची. न आता हे थाट. हालत बदलत जाते माणसाची. मागच्या लोकांचं पुण्य म्हणा की आणखी काही. पण दिवस बदलत जातात. पण अनेकाना हे समजत नाही आणि मग ते तिथेच अडकून पडतात. आपल्या सदाकाकासारखे. दरवेळी भेटला की लेक्चर देतो. सचोटीने राहा. पैसा खाणे बरे नाही. करप्शन फार दिवस चालत नाही.भले भले डुबले तिथं तुझं काय? तुझा बाप देवमाणूस होता. कधी कुणाचा एक पैसा शिवला नाही त्यानं. आपण सदाकाकाचं मन राखायला ऐकून घेतो. सदाकाका इमानदार माणूस आहे. आयुष्यभर बँकेत प्यून म्हणून राबला पण पोराना व्यवस्थित शिकवलं. आमचीही वेळोवेळी मदत करायचा. आईला याचा आणि काकूचा मोठा आधार वाटायचा. आता काकाची पोरं आपल्याकडून अडल्यानडल्याला पैसे नेतात.त्याला हे माहितच नसतं.आपण सढळ हाताने देतो. कधी विचारीत नाही कशासाठी पण ते सांगतात. मागे लहान्याच्या घराची सुरुवातीची रक्कम कमी पडत होती म्हणून तो आला. आपण चार लाख असे दिले. येतील तेंव्हा दे म्हटलो. पण तोही इमानदार. हातउसण्याची नोटरी घेऊन आला आणि सही करून देऊन गेला, सहा महिन्यात बिनव्याजी देतो म्हणून. आपण हसलो.तो म्हणाला तुझं हसणं कशासाठी आहे - मी पैसे देणार नाही असं वाटतंय म्हणून का? आपण म्हटलो नाही रे. सध्या वरकमाई बंद आहे, तुझ्याकडं वापस मागायची वेळ येते की काय असं वाटलं म्हणून हसलो. पण खरंच का हसलो आपण. साला हा काळ आणि तो काळ असलं काही स्वतःची पाठ थोपटण्याचा काहीतरी प्रकार होता तो. पैशाची खुमखुमी असतेच माणसाला. काही मान्य करतात काही करीत नाहीत.

            यावेळी सदाकाका, त्याची पोरे, काकू आणि सगळा भूतकाळ तेंव्हा डोळ्यांपुढून वाहता झाला. माणसं म्हणजे पाऊलखुणा किंवा वर्षांची चिन्हे बनून राहतात. प्रत्येकाची एक खूण, एक चिन्ह. वडील गेल्यानंतरची भकासी आठवली. घरात आपण आणि आई दोघेच. अधून मधून एखादा दूरचा नातेवाईक भेटायला यायचा. एरवी सदाकाका आणि त्याचं कुटुंब हेच आमचे साथीदार. ते शेजारीच राह्यचे. सणासुदील घरी वगैरे बोलवायचे. आपण तेंव्हाही तिथे तटस्थासारखे वावरायचो. क्वचित बोलायचो. पोर्या लैच कमी बोलतो असं काकी म्हणायची. साधू बोवा बनतो क्काय अशी गंमत करायची. पण आपण निव्वळ वडील गेले म्हणून गप्प झालो होतो का. की ती निव्वळ एक घटना होती आपली सत्वपरीक्षा पाहणारी. हा माणूस तुटतो की तुटत नाही हे बघण्यापुरती तात्कालिक आपदा. एरवी मरणारा सुटतो असे घरीदारी सर्रास बोलतात लोक. मागे उरणार्यांचीच अवस्था होते. पण ही दुर्गत सगळ्यांचीच होत असावी. एरवीही या समाजात आपण एकटेच नसतो. आपल्या सभोती माणसांचा अफाट गराडा असतो, त्या गराड्यातल्या प्रत्येकाची एक कथा असते. थोड्या बहुत फरकाने बहुतांची पांगाडीच होते. निदान आपल्या दुनियेतल्या माणसांची तरी. ही दुनिया मध्य शहरी लोकांची होती. वीसेक वर्षांपुर्वी लहान खेडेगावांतून लहान शहरांमध्ये आलेले लोक. या शहरांमधून असणार्या गावासारख्या भागांमधून एकत्रित राहणारे लोक. शहरात आले तरी आपली भाषा न आपला चेहेरा जपून राहिलेले लोक. त्यामुळे समुहाच्या सुरक्षिततेत असणारी आपलेपणाची भावना तिथे होतीच. पण आपण या सगळ्यामध्ये राहूनही तुटकच होतो, आहोत. आता तर त्या जीवनाचा मागमूसही राहिलेला नाही आणि आपण खूप लांबवर निघून आलो आहोत. पण आई अजूनही तिथेच राहते. आपण अनेकदा मागे लागूनही तीने ते घर सोडलेलं नाही. म्हणाते तुझ्या वडीलांच्या आठवणी आहेत या घरात. आपण एवढा पैसा कमावला पण तीने कधी काही मागितलं नाही. वडलानी मागे सोडलेलं घर आणि पोस्टातले तीन लाख रुपए, एवढी बेगमी तिला आयुष्यभरासात पुरेशी आहे. वडील गेले त्यानंतर त्या पोस्टातल्या पैशावर मिळणारं व्याज हीच आमची एकमेव कमाई होती. तिच्यावर आईने घर चालवलं. आपलं शिक्षण पूर्ण झालं ते इबीस्या लाऊन लाऊन कसंबसं. आधी पदवी मिळवली आणि मग पदव्युत्तर शिक्षण. तोवर यव वाढून गेलं होतं, सोबतचे गडी करते सवरते झाले होते. कमी शिक्षणामुळे त्यांची गत यथातथाच होती पण निदान कमावते झाले होते. त्यातले एखाद दोन अधून मधून भेटायचे, बियर पाजायचे. आपल्याला ही छानछौक शोभत नाही असं वाटूनही आपण नैराश्य घालवण्यासाठी म्हणून थोडीफार घ्यायचोच. आता गंंमत म्हणून दिवसाआड महागडी पितो तेंव्हा जुने दिवस आठवतात. शिक्षण होऊनही सुरुवातीला हातात काहीच नव्हतं. मग आपण एका विना अनुदानित शाळेवर क्लर्कची नौकरी धरली. आठशे रुपए महिना ठरलेला पण दरमहा मिळेलच असा नेम नव्हता. बघता बघता तिथं साताठ महिने गेले. पैकी चारच महिन्यांचा पगार झाला, बाकी डुबले, पण या पैशाचाही केवढा आधार झाला होता.आपण आईसाठी एक साडी घेतली , घरात काही वस्तु घेतल्या.मग एक दिवस सरकारी परिक्षेची जाहिरात पाहिली आणि अर्ज भरला. अक्कल हुशारीने आधी प्रवेश परिक्षा आणि नंतरची मुलाखत काढते झालो न ह्या नौकरीचा धडा सुरू झाला. पहिल्या वर्षभरात नुसतीच हौसमौज केली. कपडे घेतले.मग एक मोटारसायकल. नातेवाईकानाही काहीबाही भेटी दिल्या. लेकरू लईच गुनाचं हाय ओ माय. काकी कौतुकानं हेल काढून बोलायची. मग बदली झाली. जालन्यातल्या राहत्या घराची डागडुजी करून आपण इथे आलो. इथे येऊन गेल्या काही वर्षांत आपला डील डौल पारच बदलून गेलायं.आई मात्र तिथेच थांबली. कधी मधी येते आपल्यासोबत राहायला. म्हणते भौ लग्न कर. मला मरण्याआधी नातवंडांची तोंडे बघू दे. आपण नुसतीच मान हालवतो. एकतर आपले नातेसंबंध साधारण त्यामुळे चांगल्या शिकलेल्या पोरी सांगून येत नाहीत. त्यात तशी गरजही नाही आणि आपल्याला बंधनात अडकायची इच्छाही नाही अजून. आलेल्या पैशावर अजून हौसमौज करायचीय अजून. एवढ्यात लग्नाची कटकट नको.सोबतच्या रुईकराचे हाल बघतोच आहे की.जरा निवांत बसला की आलाच बायकोचा फोन. पक्का घरघुशा झाला आहे. नाहीतर कसला मुजोर होता. भडवा पुर्णविरामाच्या जागी शिव्या द्यायचा. आजकाल होरे नाहिरे असं काहीसं बोलत असतो. आपण असेच होऊ याची गॅरंटी नाही पण काय सांगा ?

           यंदाचा उन्हाळा खूपच तापदायक दिसतो आहे. संध्याकाळ तशी आल्हाददायक असते. दिवसभर पण नुसती काहिली. करोडोंची कंत्राटं पास करत असलो तरी आपण काम करतो ते या जुनाट सरकारी ऑफिसात. इथे एअर कंडीशनिंग नाही. डेझर्ट कूलर दिवसभर आवाज करत सुरू असतात पण जीवाची काहिली काही कमी होत नाही. झक मारली न सरकारी नौकरी धरली. नाहीतर सदाकाकाचा मोठा मुलगा. कुठल्याशा कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. सांगतो की दिवसरात्र भन्नाट एसी सुरू असतात. स्वतःच्या केबिनमध्ये बसून काम करतो निवांत. बरेचदा तर घरूनच काम करतो. शिवाय अधून मधून परदेशातही जातो. जिथे जाईल तिथले फोटो आपल्याला आवर्जून पाठवतो. त्याच्या भाषेत बोलायचं झालं तर जीवनाचा आनंद लुटतो. हे फोटो बिटो आपल्याला उथळपणाचे लक्षण वाटते एरवी, पण ह्या भावाचे मात्र कौतुकच वाटते. मागे पुढे परदेशातच स्थाईक होइन म्हणत असतो. बाकीचे नातेवाईक हटकतात, पण आपण त्याची नेहमीच पाठराखण करतो. मागे त्याने त्याच्या ऑफिसातले काही फोटो दाखवले. चकचकीत, निळसर काचेरी उत्तुंग इमारती. विचार आला, आपण इथे बक्कळ पैसा मिळवतो पण निव्वळ भंगारात काम करतो आहोत. इमारतीतली लिफ्ट कधीच चालू नसते. सगळ्या जिन्यांच्या भिंती लोकानी पानाच्या पिचकार्या टाकून टाकून रंगवलेल्या. शासन लवकरच बजेट काढणार आहे म्हणताहेत, या इमारतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी. कराल बाबा पण तोवर वैताग आहे.

             शहरातली प्रचंड गर्दी टाळत टाळत ऑफिसात पोचेतो कंटाळायला होतं. त्यात हा जीवघेणा उकाडा. सरकारी कामांची तगतग, दिवसभर भेटायला येणारे लोक, मंत्र्यांचे दौरे आणि वैतागवाण्या इतर अनेक गोष्टी. त्यात आता कुठलातरी सरकारी महोत्सव आला आहे. साहेबाला यात भारी रस. सगळे नियोजन त्याच्याच हातात आहे. त्याच्याबरोबर आपण आणि चंद्या आहोतच. शिवाय सगळी यंत्रणा. साहेब तर साहेब, त्याचा बापही या बाबतीत भलताच रसिया. आजकाल तोही येऊन बसतो ऑफिसात. मोठमोठ्या गप्पा हाणतो. नको तिथे नाक खुपसतो. नवी पिढी तत्ववादी नाही म्हणत असतो. आम्ही कशी कामे केली पहा म्हणतो. एक पैसा घेतला नाही कुणाचा कधी न काय काय. आपण शांतपणे ऐकून घेतो, काही बोलत नाही; पण चंद्या खूपच वैतागतो. एकतर सध्या पैसा मिळत नसल्याने तो निव्वळ कावलेला असतो आजकाल. त्यात सरकारी कार्यालयांची दुनिया छोटीच; कोणी कुठल्या योजनेत किती मलिदा दाबला ह्याची नेटकी माहिती सगळ्यांकडे असते. एक दिवस साहेबाचा बाप फारच रंगवून आपल्या साधेपणाच्या गोष्टी सांगत होता. बराच वेळ त्याची लामन सुरू होती. शेवटी चंद्याकडून राहावले नाही. म्हणाला साहेब आपण आम्हास वडीलधारे. पण आपण आणि तडपल्लीवार साहेबांनी मिळून उभे तिरना धरण लुटून खाल्ले हे अक्ख्या दुनियेला माहिती आहे. साहेबाचा बाप यावर चाटच पडला. संतापून जो निघून गेला तो पुन्हा ऑफिसकडे फिरकलाच नाही. आपण चंदयाला म्हटलो, चंद्या तुझ्या जिभेला हाड नाही, पक्का अवकाळी आहेस. कधी कुणाची उतरवशील नेमच नाही. पण हे काम जबरी केलंस गड्या. म्हातारा जाम इरिटेटींग आहे. बरा कटवला त्याला. अर्थात साहेबाचा बाप नसला तरी साहेब होताच. हा महोत्सव म्हणजे घरचं कार्य असल्यासारखा लगबगीने फिरत होता पाची दिवस महोत्सवाच्या शामियान्यांमधून. परत आपला परिचय करून द्यायचा कलाकारांसोबत. हे अमुक साहेब, तमुक साहेबांचे नातू. मोठे कलाकार आहे. आपण काय कमी कलाकार आहोत का असे यावर चंद्या हळूच बोलायाचा आणि आपण जाम हसायचो. बरं या कलाकार मंडळींचा थाटही भारीच. एकदा एक उस्ताद आले ते एकदम हळदी रंगाचा तलम झब्बा घालून. तोंडात विडा रंगलेला. गळ्यात पिवळी धम्मक सोन्याची साखळी. सोबत चार पाच प्रौढ बायकांचा घोळका. आपण चंद्याला म्हटलो, साला तू नुसताच तब्ब्येतीने रसिया. असं पिवळं धमक राहाता आलं पाहिजे गड्या ! ह्यावर चंद्या नेहमीच्या स्टाईलीत बकाबका हसला. त्यात ह्या उस्ताद साहेबांनी भलं मोठं लेक्चर दिलं. संस्कृती आणि परंपरा, आपला इतिहास. मग त्यांच्या गुरूच्या गोष्टी नि ह्यांच्या गुरूभक्तीच्या. अनेकदा कानाला हात लावत होते. आपण अशावेळी फार बोलत नाही. ऐकून घेतो. कोण जाणे खरंच मोठा माणूस असावा. आपण मूर्खासारखे काही बोलून तोंडघशी पडायचो. आपला चिंतकाचा पिंड नाहीच, पण बर्याच गोष्टी पटत नाहीत आपल्याला. या उस्तादांबद्दल्ही असंच झालं. आपण बराच वेळ ऐकत राहिलो आणि मग काहीबाही सांगून तिथून निघते झालो. आपला साहेब एरवी समजदार, पण त्याला प्रसिद्ध लोकांसोबत मैत्री करण्याचा मोठाच सोस.आता तर त्याच्या उत्साहाला धुमारेच फुटले होते. काहीबाही बोलत होता उगाच मध्ये-मध्ये. मध्येच आपला महागडा मोबाईल दाखवत आपण किती संगीत ऐकले आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. नको तिथे वाह वाह म्हणत होता. हे उस्ताद आपल्या क्षेत्रात पोचलेले. मनातल्या मनात साहेबाला मूर्खात काढत असावेत असे त्यांच्या सूचक हास्यावरून वाटत होते. या उस्ताद लोकाना अशा उथळ पण महत्वाच्या चाहत्यांची भारीच गरज असते. कलाकार असो वा सरकारी नोकर. शेवटी प्रत्येकालाच पोट आहे. प्रत्येकाला आपापले दुकान चालवायचे आहेच. भूक ही मूलभूत गरज. त्या नंतर येते ती धनेषणा आणि कामेषणा. या नंतर येणारी सामाजिक महत्वाकांक्षा माणसाला अनेक गोष्टी करायला लावते. उथळांसोबत उथळ होणे ही त्यातलीच एक. त्या रात्री त्या विशिष्ट गराड्यात आपणही बराच वेळ उथळ होते झालो. जगराहाटीला सामील होऊन वाहते झालो. असो.
   
       हा महोत्सव एका मोठ्या वास्तूच्या पायथ्याशी होता. मागे भला मोठा भव्य पहाड. लोक त्याला खडक्या पहाड म्हणत. आपण शामियाना सोडून बाहेर आलो. तिथून चालत चालत मागच्या मोकळ्या मैदानात. मध्यरात्रीची वेळ, शामियान्यातून येणारा वीजदिव्यांचा प्रकाश आणि वर चंद्र चांदण्यांचा सावकाश उजाळा. या उजेडात मागचा पहाड प्रचंड दिसत होता. धीरोदात्त. हजार गोष्टी गिळून घेऊन स्थितप्रज्ञासारखा उभा. आपण किती किरकोळ आहोत ह्याची जाणीव त्यावेळी प्रकर्षाने झाली. बहुतेक गोष्टी आपल्या समजण्यापलिकडच्या. निव्वळ अनुमेय, अपरिमेय. आपण उगाचच पहाडाच्या उंचीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला न मग ओशाळलो. ह्या धीरोदात्त अपरिमेयापुढे आपण निव्वळ मोजण्याइतपतच आहोत.अशा वेळा मोठ्या कठीण असतात. माणूस उगाचच नको त्या गोष्टींबद्दल विचार करू जातो. क्षणभरात डोळ्यांपुढून काय काय फिरून जातं. आपल्या लुटुपुटूच्या लढाया. आपले जय पराजय. चुकलेली हजार गणितं, प्रेम, संभोग, नाती, गोती आणि इतर हजारो गोष्टी. आणि मग एक नीरव शांतता जिच्यात सगळं काही वितळून जातं. उजेड पडण्याचा किंवा आपले सामर्थ्य नाहीसे होण्याचा क्षण. एरवी आपण या सामर्थ्यावर गुपचूप अहंकार बाळगून असतो. माझं शरीर माझ्या ताब्यात आहे. माझी परिस्थिती माझ्या नियंत्रणात आहे. मी सावध आहे. हा अहम मोठा आणि तीव्र असतो. या अशा अनाथ वेळा मात्र सगळ्याच गोष्टींचा विलय घडवून आणतात. उरत असाव्यात त्या ढोबळमानाने फक्त डोंगरापलिकडच्या गोष्टी.आपण त्या निर्व्याज प्रहराचा अनुभव घेतला कितीतरी वेळ. तासाभराने भानावर आलो ते मोबाईलची घंटी ढणाणा वाजली म्हणून.

            फोनवर चंद्या असतो. कुठे गायब होतोस रे तू ?लवकर पोडीयमजवळ ये. साहेब भलताच कावलाहे. आपण उसासा टाकत काहीसे वैतागूनच पोडीयमच्या दिशेने चालू लागतो. काय झालं असेल? साहेबाला नक्की कशाचा राग आला असेल याचा विचार करत. आणि आला तरी ही काय वेळ झाली. जवळपास मध्यरात्र. शेवटचा कार्यक्रम संपून गेलेला. लोक आपापल्या घरांच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेले. पोचतो तर बघतो साहेब क्लास फोरना झापतोय. पोडीयम जवळ काही कचरा आहे जो उचलण्याची कुणी तसदी घेतलेली नाही. काही प्रेसवाले फोटो काढून, शुटींग करून गेलेत. कर्मचारी आपली बाजू समजावण्याचा प्रयत्न करतात. साहेब, ही जवाबदारी कंत्राटदाराची आहे. आम्ही काय करणार. तरी अर्ध्याहून अधिक कामे आम्हीच करीत आहोत. म्होरक्या असणारा सदाशिव बोलत असतो. उच्चशिक्षित मुलगा. इतर काही मिळत नसल्याने हे काम करणारा. वागायबोलायला एकदम व्यवस्थित. म्हटला, कंत्राटदाराला अनेकदा सांगितलं, पण तो आमचं काहीच ऐकत नाही. यावर साहेब आणखी भडकतो. जवाबदारी ढकलू नका. तुम्ही सगळे कामचोर आहात. एवढा कचरा ? त्यानं नाही उचलला तर तुम्ही का नाही उचलत ? पत्रकारांनी तब्येतीने फोटो काढलेत इथल्या घाणीचे. ह्याची आता देशभरात बोंब होईल.दिवसभर टीव्हीवर दिसत राहील हा कचरा. एवढा महत्वाचा उपक्रम, तुम्हा लोकाना काही समजत नाही. नालायक कुठले. बेजबाबदार. यावर सदाशिव बोलू जातो पण चंदन त्याला मागे लोटीत पुढे जातो. ओ साहेब. शीदा. नीट बोलायचं. नालायक कोनाला बोल्ता ? हँ ? आमाला काय याचा पगार मिळतो काय ? फालतू नई बोलायचं. सदाशिव त्याला रोखू जातो. चंदन गुरकावतो, सद्या भेंचोद मधी पडू नको उगं. मुस्काटात हानीन तुझ्या. बाकीचे दोघे तिघे चंदनला मागे ओढतात.

                 सगळा घोळका आता दोन भागात विभागला जातो. अनेक आवाज येऊ लागतात. चंदन सगळ्यात लाऊड. लोक आपल्याकडे लक्ष देताहेत हे बघून तो आणखीनच चेकाळतो. जोरजोरात बोलू लागतो. प्रकरण बिघडते आहे म्हणून आपण मध्ये पडतो. साहेबाला तिथून थोडे बाजूला नेतो. साहेब हपकलेला असतो. ही प्रतिक्रिया त्याला अगदीच अनपेक्षित असते. आपण म्हणतो, हे प्रकरण हाताबहेर जाईल. चंदन आडमूठ आहे. आपल्याला बधणारा नाही. त्याच्यामागे सगळे कर्मचारी आहेत. शिवाय चूक तुमचीही आहेच. नालायक कसं काय म्हणू शकता ? लोक गेले चार दिवस राबताहेत. कंत्राटदाराचे लोक दमदाट्या करतात. तो वजनदार माणूस आहे. हे लोक तरी काय करतील ?

                   साहेब म्हणतो, अहो तुम्ही असं कसं बोलू शकता. मी देखील राबतोच आहे की गेले चार पाच दिवस. शिवाय तुम्ही आणि चंद्रकांतही. मग यानाच काय प्रॉब्लेम आहे? आपण म्हणतो, ते सगळं ठीक आहे पण जे झालं ते टाळता आलं असतं. हे आता वैयक्तिक पातळीवर घेतलं जाईल.सरळ माफी मागून टाका. साहेब एव्हाना वरमलेला असतो पण म्हणतो मी का माफी मागू ? अशाने कर्मचारी शेफारतील. जे होईल ते बघून घेऊ. ठीक आहे, निदान आपण आता इथे थांबू नका. चंदनचा भरवसा नाही. मोकाट आहे.

                    तिकडे चंद्या मध्ये पडलेला असतो. का बे चंदन. तुझं डोकं फिरलं का ? ही काय पद्धत तुझी साहेबांशी बोलायची ? हा काय मोहल्ला आहे का बे तुझा. यावर चंदन कावतो, हे बगा साहेब, तुमी उगा मधी पडू नका. हे प्रकरन या साहेबाला लई महाग पडनारे. बगून घेऊ. आता चंद्याचाही आवाज चढतो. हे बघ, उगाच आगाऊपणा करू नकोस. तुझी प्रकरणे कमी नाहीत. जास्ती करशील तर गोत्यात येशील. सदा, प्रकाश, याला घेऊन जारे. लाऊन आलेला दिसतो आहे. उद्या ऑफिसात बघू काय करायचं ते. चला निघा आता आपापल्या घराकडं. आपण दुरून बघत असतो. चंद्याने प्रकरण बघता बघता निकाली काढलेलं असतं. निदान तेंव्हापुरतं तरी. थोड्यावेळाने आपण साहेबाला निरोप देऊन चंद्यासोबत तेथून निघतो. चंद्या म्हणतो आज बसू राव निवांत बोलत. या कार्यक्रमाने वीट आणलाय बघ. सरकारी गाडीने मग आम्ही तिथून निघतो.

                 ड्रायवर गाडी गावाबाहेर असणार्या एक हॉटेलाजवळ आणतो. शहराच्या वीसेक किलोमीटर बाहेर ही हॉटेलांची अख्खी रांगच उभी राहिलेली. पूनम. चांदनी. उजाला अशी नावे असलेली हॉटेलं. हायवेच्या दुतर्फा दिव्यांप्रमाणे चमचमत असतात. काहींच्या दारात उसनं अवसान आणल्यासारखी रोशनाईही असते; अशी की जणू इथे येणारे हा उजाळा पाहून हरखून जात असावेत. काय मौज आहे. बाहेरचा उजेड आणि आतला अंधार ह्यांची सांगड अशा ठिकाणी किती सहज घातली जाते. ह्या हॉटेलांचं एक बरं आहे. इथं रात्रभर दारू पीत बसा कोणी हटकणारं नाही. तसंही आपण सरकारी, आपल्याला कोण काय करणार ? पण एक भीड असतेच माणसात. बाकी चंद्याची ओळख असते इथेही. सरबराई होते. सगळ्यात चांगलं टेबल मिळतं.थोडा वेळ हॉटेलचा मालक येऊन काही बाही बोलत बसतो. आपलं लक्षच नसतं. मघाशी झालेला प्रकार डोक्यात घोळत असतो.हा नेमका कुठला संघर्ष आहे. ह्याला वर्ग संघर्ष म्हणावे का. चतुर्थ श्रेणीबद्दल आपल्याला तसंही नेहमीच वाईट वाटतं. आपण एकेकाची कथा घेऊन मनातल्या मनात चाळत असतो. सदाशिवसारखा मुलगा. थेट एम ए आहे. अत्यंत समजदार, हुशार तरुण. याला याहून चांगली नोकरी मिळू नये? कुणाची चूक होत असावी. व्यवस्थेची, समाजाची की निव्वळ नशीबाची. चंदनसारख्याचं आपण समजू शकतो, तो शिकलेला नाही फार. मुळातच यंग्रट आहे. वालंटर टायपातला. दुसर्या बाजूला आपण आहोत. किंवा चंद्या, साहेब. भरपूर पैसे छापणारा या हॉटेलाचा मालक. आपण चंदन किंवा सदाशिव म्हणून जन्माला आलो असतो तर काय झाले असते असा दैवव्यपाश्रयी विचारदेखील आला. नदीच्या दोन तटांवर असल्यासारखे दोन विभक्त समाज आपल्यातून जगत असतात. थोडेसे बरे असणारे थोडेसे बरे नसणार्यांचा निवाडा करायला सतत सज्ज असतात. मघाशी आपण चंदनला वालंटर ठरऊन मोकळे झालोत तसे.

             बाहेर पाऊस सुरू झालेला असतो. चंद्या काही योजना बनवून सांगत असतो. आपल्याला त्याच्या डोक्याची कमालच वाटते. आपण म्हणतो साला तू काही निचिंतीने बसूच शकत नाहीस. आत हे काय नवीन खूळ काढलंस. म्हणे पंढरपूरला जायचं. कोणत्या तोंडाने देवाला भेटायचं रे.आपण शंभर लफडी केलीत. खा खा पैसा खाल्ला. विठोबा म्हणेल एक हेच राहिले होते मला भेटायला यायचे. चंद्या यावर हसून म्हणतो, अरे चालायचंचं. ल्फडी कोण करत नाही? हँ ? बिनल्फड्याचा माणूस दाखव मला तू ह्या जगात. तुला एक उदाहरण सांगतो. आमचा एक काका होता. दूरचाच पण एका गावत असल्याने बर्यापैकी घसट होती. मोठा सात्विक माणूस होता. सगळे म्हणायचे माणूस असावा तर असा. एक दिवस आमच्या बाबांनी ह्याना शेजारच्या गावात बघीतलं दुसर्या बाईसोबत. नंतर कळालं की हे साहेब अनेक वर्षांपासून दोन घरे चालवीत होते. आता बोल. हँ? यावर आपण हसून म्हणतो अरे चालायचंचं. असेल काही अडचण बिचार्याची. काय सांगावे त्याची पहिली बायको त्याला समजूत घेत नसेल. किंवा ती दुसरी बाई जेन्युइन असेल आणि हा खरेच तिच्या प्रेमात पडला असेल? हेच तर. चंद्या उसळून म्हणतो. आपली देखील अडचणच आहे की रे. गरज म्हण वाटल्यास. कोणाला गरज नाही जगात? गरजेपोटी होतात गोष्टी. आपण जे केलं ते कुणीही केलंच असतं. एरवी तू न मीच काय, ही अख्खी दुनियाच करप्ट आहे.

                  आपण म्हणतो, चंद्या तू गोष्टी जास्तच सरळ करून समजून घेतोस. इतकं साधं आहे का हे ? मार्ग निवडण्याची ढब म्हण हवं तर, पण ती चुकते आहे आपली कुठेतरी. मग आपण काही बाही बोलून गप्प बसतो. हा दारूचा प्रभाव असावा बहुतेक. पण पुन्हा विचार येतो, चंद्या तरी काय चूक बोलतोय. ह्या सगळ्याची पक्की सवय झाली आहे; या इथून दहा वर्षं मागं जायची तयारी नाहीच व्हायची आपली आता. तो अभाव,ते जीवन नकोच पुन्हा.

2

                   मोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होवून गेलयं ते सांगते. दरवेळी एखाद दुसरा नातेवाईक ह्या ना त्या कारणाने गेलेला असल्याचे समजते. दरसाल माणसे पडत जातात. आईचं हे सांगणं बरेचदा माझे फारसे दिवस राहिलेले नाहीट हे सांगणंच असतं. आपण ओळखून विषय टाळतो.ती आपल्यासमोर वैद्यकीय तपासण्यांची अख्खी फाईल मांडते. जणू आपल्याला हे सगळं समजतं आहे अशा उत्साहात आपण ते सगळं बघतो. आईला धीर देतो. ह्यावेळी तिचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे म्हणून डॉक्टरानी तिला काही नवी औषधं सुरू केलीएत. बाटलीतलं ते लालभडक औषध बघून आपण उगाचच अरे वा म्हणतो. भारीच औषध दिसतयं. तुला नक्की आराम पडेल याने.यावर आई नेहमी प्रमाणे भला मोठा उसासा टाकते.

                  तिची तगमग या तपासण्या आणि औषधांपेक्षा वेगळी आहे हे आपल्याला समजतं. खरंतर हे आपल्याला अनेक वर्षांपासून समजत आलेलं आहे. तिला नातवंडांचं तोंड बघायचं आहे. तिची अपेक्षा वयपरत्वे रास्तच आहे. एरवी तिचं आयुष्य संघर्ष आणि अभावांतच निघून गेलं होतं. वडील गेल्यापासून ते आपल्याला नौकरी मिळेपर्यंतचा काळ.  तब्बल बारा वर्षं. आमच्या बोल्ण्यात ह्या बारा वर्षांचा उल्लेख नेहमीच येतो. आई म्हणते, बाबा, रामचंद्रालादेखील बारा वर्षं वनवास सहन करावा लागला होता. आपण तर साधी माणसंच.

                  मग काही बाही आठवणी निघतात. एखाद दुसरी दुखरी नस. सणासुदीच्या दिवसांमध्ये आजूबाजूच्या घरांमध्ये असणारी लगबग, रोषणाई आणि आपल्या घरातला अंधार आणि उदासी. परिस्थिती नसतानाही आई जमेल ते प्रयत्न करून आपल्यासाठी कपडेलत्ते करायची. आपण तिचं मन राखायचो पण प्रचंड वाईट वाटत राहायचं. आईच्या आनंदाचं काय? आपलं जे झालं ते झालं किमान आपल्या मुलाने चांगलं आयुष्य जगावं अशी तिचा प्रयत्न असायचा. आपण आणि आपले वडील हे तिचं सर्वस्व. वडील गेल्यानंतर आमच्या घराची आणि पर्यायाने आमचीही रया गेली.

                  कुटुंबातलं एखादं मरण त्या संपुर्ण कुटुंबाला उध्वस्त करून जावं असं काहीसं होवून गेलं होतं. नातेवाईक, त्यांचे जाणते अजाणातेपणी होणारे उपकार,मदत. त्या उपकारांचं आपल्यावर झालेलं ओझं. हजार गोष्टी आहेत. घरी गेलं की ह्या सगळ्या गोष्टी डोक्यावर येवून कोसळतात. आपल्या डोळ्यांमध्ये सर्वदूर पसरून राहिलेली ही बेरंगी कुठेतरी आपल्या जुन्या दिवसांची देण असावी. खरंतर जगात रंगांची कमतरता नाही. पहाटेची केशरी भगवेपण. रात्रीची अथाह निळाई. रस्त्यावर दुतर्फा फुलणारी पिवळी-जर्द फुलं. आपल्या घरासमोरची जास्वंदी. वाट्टेल तितके रंग आहेत. आपल्याला ह्या सर्वांचा सपशेल विसर पडावा का ? की आपल्या रक्तातंच पाणी साचलं आहे ?

                कधी आला भाऊ ? एक प्रेमळ वयस्कर आवाज आपली तंद्री भंगवतो. द्रौपदामावशी, आईची मोठी बहीण आलेली असते. अरे मावशी ! तू कधी आलीस. आपण गडबडून विचारतो. मघाशीच आले बाबा. तुम्हा मायलेकाचं बोलणं सुरू होतं. म्हटलं कशाला खोडा घाला ! ह्यावर आई म्हणते, कायं गं आक्का, काही बोलते. तुझं येणं कसं खोडा होईल बाई? आई पुढे होत बोलते. बैस कशी इथं. मी चहा टाकते तुझ्यासाठी. आई अक्काला बसवून स्वयंपाकघरात लगबगीने जाते. आपल्या बहिणीला भेटून झालेला आनंद तिच्या लगबगीतून स्पष्ट जाणवतो.

                      आई आणि अक्का दोघी सख्ख्या बहिणी. दिसतातही एकदम बहिणी बहिणीच. पण बहिणी कमी आणि मैत्रिणीच जास्त आहेत एकमेकींच्या. अक्काचा स्वभाव खूपच मायाळू. तिच्या तुलनेत आई थोडी कठोरच आहे. ऐन तारुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीने आईच्या स्वभावत कडवटपणाच येवून बसला होता. अक्का बिचारी फारच मऊ होती. एवढा मोठा संसार नेटाने सांभाळणारी. तीन पोरं आणि दोन पोरी असा मोठाच कुणबा होता तिचा. हाताला थोडीफार जमीन पण ती देखील कोरडवाहूच. घरी गरिबीचे कायम वास्तव्य. पण अक्काचं मन मोठं होतं. कधी कुणाच्या घरी रिकाम्या हातानं गेली नाही. काहीतरी घेवूनच यायची खायला. नाहीच काही मिळालं तर किमान डझनभर केळी तरी. तिच्या ह्या स्वभावाचं कायम कौतुकच वाटत आलं आहे आपल्याला. ही साधी माणसं, एवढी  मायाळू, एवढी माणुसकी असणारी. आणि दुसरीकडे आपण बघतो ते, ज्यात जगतो ते साधनसंपन्न जग.आपल्यासकट आपल्यासारख्या  कोत्या माणसांनी भरलेलं. दहा प्रकारचे विमे काढूनही आपल्याला नीट झोप लागत नाही. मागे ऑफिसाआतल्या गणपतीसाठी पब्लीकने आपल्याकडून दोन हजार वर्गणी काढून घेतली तर दोन दिवस करमलं नाही आपल्याला.

                    बाकी काय, मुलं कशी आहेत ? आपण मावशीच्या एकेका मुलाचे नाव घेवून पृच्छा करतो. धाकला इथे, मधला तिथे. मोठा गावी. अजून कोणकोण कुठंकुठं. मावाशी भरभरून सांगते. आपण समजून घेतो आहोत असे दाखवण्याचा भरपूर प्रयत्न करतो. पण एवढं मोठं गणगोत, ते एका संवादात लक्षात राहणं कठीणंच. गेल्या काही दिवसांत अक्काची आर्थिक स्थिती बर्यापैकी सुधारलेली आहे असं समजतं. नाशिककडून आलेल्या पाण्यामुळं तिच्या शेतीचा भाव वधारला आहे. हे ऐकून आपल्याला खरंच आनंद होतो. कुठेतरी एखाद्या चांगल्या कुटुंबाचं भलं होतंय हे पाहून होणारा निरपेक्ष आनंद. मग विषयाला फाटे फुटत जातात आणि तिच्या घराचा विषय निघतो. मुलांनी तिचं घर विकायला काढलं आहे असं सांगून अक्का डोळे टिपू लागते. तिनं आणि तिच्या नवर्यानं मोठ्या कष्टाने बांधलेलं हे घर. त्या घरातंच तिनं आपलं बहुतेक आयुष्य काढलेलं. मुलांची दुखणीखुपणी, त्यांचं बालपण. या घरातच तिच्या नवर्याचा मृत्यू झाला. ह्या सगळ्या आठवणींचं अधिष्ठान असणारं हे घर मुलांनी बाप मरतो न मरतो तोच वर्षभरात विकायलाही काढलं होतं.

                  रडू नकोस, आक्का. ही तर जगराहाटीच आहे. हे जुनं घरं जाईल तर तुझ्या मुलांची नवी, सुखसुविधांनी युक्त घरं होतील हे का वाईट आहे ?  आपण उगाचंच काहीबाही सांगून तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. एव्हाना चहा घेऊन आलेली आईदेखील काही सांत्वनपर बोलू लागते. आपण आक्काला समजावण्यासाठी म्हणून बोललो खरं पण जुनं जाऊन नवं येण्याची ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा मोठीच जीवघेणी आहे. बरं झालं आपल्याला भावंडं नाहीत असा एक विचारही त्यावेळी मनात चमकून गेला.

                  मावशीचं घर कुणा जवळचाच नातलग विकत घेणार आहे. मुलं घर विकून आलेला पैसा सचोटीनं वापरणार नाहीत अशी तिला काळजी वाटते. मोठ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. मधला व्यसनी आहे. धाकल्याची संगत वाईट. शिवाय मुलींना वाटा दिला जाणार नाही, त्यामुळे भविष्यात जावई उलटतील आणि हिस्सा मागायला लावतील अशी शंकादेखील तिला भेडसावते आहे. पैशावरून आताच मुलांमध्ये आणि त्यांच्या बायकांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. काय गंमत आहे पाहा, सगळी रक्ताचीच नाती, पण एकदा पैसा मध्ये आला की निव्वळ व्यवहार सुरू होतो !

                 आई आणि मावशीसोबत खूपच गप्पा होतात. बघता बघता संध्याकाळ होते. जेवणानंतर फिरायला म्हणून बाहेर पडतो. पलिकडच्या गल्लीत वेरुळकर सरांचे घर आहे. त्याना भेटून यावे असा विचार येतो. वेरुळकर आपल्याला इंग्रजी शिकवायचे. तळमळीचे शिक्षक - अत्यंत कमी पगारावर जीव तोडून काम करणार्या आदर्शवादी-ध्येयवादी पिढीतले झाड. ह्या लोकांनी आपली उमेदीची वर्षं अशीच घालवून टाकली. ना धड पैसा मिळवला ना केलेल्या कामचे श्रेय. पण तरीही ह्यांच्या चेहेर्यावर समाधान दिसून येतं. अशी गोष्ट जी आपल्याला कदाचित कधीच साधणारी नाही.
               
                    विचार करता करता सरांच्या घराजवळ जावून पोचतो. दार उघडेच असते. सर बल्बच्या उजेडात काहीतरी वाचत बसलेले असतात.

                    येऊ का सर ? आपण विचारतो. अरे ! ये की असा ! विचारतोयस काय ? सर आनंदाने स्वागत करतात. आपल्याला बसायला खुर्ची देतात. आपण उगाचच थोडेसे वरमतो. राहू द्या सर. मी घेतो खुर्ची. तुम्ही बसा. सहजच आलो होतो भेटायला उभ्या उभ्या.  अरे वा ! असं कसं तू आमचा आवडता विद्यार्थी . शिवाय आता एवढा मोठा अधिकारी. तुला खुर्ची तर हवीच. सर मिश्कील्पणे बोलतात.
             
                    काय सर. तुमची विनोदबुद्धी भारीच. अहो मी साधा सरकारी कर्मचारी आहे. शिवाय माझ्या डोक्यावर अधिकार्यांची अख्खी पंगतच आहे - मी कसला आलोय अधिकारी !  अशा काहीबाही गप्पा होतात. मग चहा. सर आता बर्यापैकी म्हातारे दिसू लागले आहेत. सध्या ते आणि काकू दोघेच असतात इथे. दोन्ही मुलांची ल्ग्नं होवून गेलीएत. एक मुलगा पुण्यात असतो तर दुसरा मुंबईत असे समजते.

                     मुलासोबत राहायला का गेला नाहीत हे विचारण्याचं धाडस होत नाही. एक तर म्हातारा तत्वांचा पक्का आहे हे आपल्याला चांगलंच ठाऊक असतं. दुसरं हे की आपली आई तरी कुठे राहते आपल्यासोबत ? खरंतर ह्या जुन्या पिढीला आपली मुळं तोडावीशी वाटत नाहीत. आपण मात्र पक्के उपरे झालेली आहोत. सरांशी बोलता बोलता मागे पडलेल्या गावांची मनातल्या मनात उजळणी सुरू असते.सर अनेक गोष्टींबद्दल बोलतात. बदलत चाललेली कुटूंबव्यवस्था, मुंबई पुण्याकडं स्थलांतरित होत असलेले लोंढे, महाराष्ट्राच्या उर्वरित भागांवर होत असलेला अन्याय. रस्तांवरचे खड्डे, धरणात राहिलेले पाणी. राजकारण, समाजकारण, जातकारण. एक ना हजार गोष्टी.

                    सर तसे समाजवादी आहेत. देशात झालेला राजकीय बदल त्याना फारसा आवडलेला दिसत नाही. आपण ह्या बाबतीत थोडे उदासीन आहोत हे संकोचत मान्य करतो. मुळात आपण मोठे झालो तो कालखंड अतिशय कंटाळावाणा होता. साम्यवाद संपल्यात जमा झालेला अणि समाजवाद मोडकळीस आलेला होता. देशात धड सामाजिक बदलही घडून येत नव्हते नि तंत्रज्ञानातही फारशी प्रगती घडून येत नव्हती. फाळणी किंवा आणीबाणी सारख्या मोठ्या घटना आपल्या पिढीने पाहिल्या अथवा भोगल्याच नाहीत. त्यामुळे आपल्या पिढीच्या विशेष राजकीय - सामाजिक भूमिकाच नाहीत असे आपण सरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग विचार येतो की कदाचित  ह्यामुळेच आपण एवढे निर्ढावलो आहोत. आपल्यापुढे आदर्श अजिबातच उरलेले नाहीत. नपेक्षा आदर्शांच्या पतनाच्या काळाअत आपण जगतो आहोत. सरांना आपण खूप मानतो पण त्यांच्यासारखे अभावांचे आयुष्य घालवण्याची आपली तयारी नाही.

                     पण मग आपल्याला जो एक सल टोचत असतो तो कसला आहे ? आई किंवा वेरुळकर मास्तरांच्या चेहेर्यावर जो एक संथ शांत भाव दिसतो तो आपण कधीच का अनुभऊ शकत नाही ?
                       
                     सर ज्या बदलांबद्दल बोलत असतात ती सामाजिक राजकीय स्थित्यंतरे नाही म्ह्टलं तरी आपणही पाहिलीच आहेत. नोकरीपेशा माणसात दिसून येणारं सामाजिक औदासीन्य आपल्यातही पुरेपुर उतरलं आहे. निवांतपणा आणि संथपणाची सवय होऊन गेलीए. मागे त्या कार्यक्रमात जो राडा झाला त्याने आपण  खूपच अस्वस्थ झालो होतो. आपल्या संथपणात ह्या अशा तीव्र गोष्टींचा खंड नकोसा वाटतो. आपण संघर्ष टाळतो.

                      पण हे योग्य आहे का ? आपण आपल्या सभोवतालाचा एक अपरिहार्य भाग आहोत. ह्या जगात जे काही उलटपालट घडतं त्यात आपणही गुंतलेलो असतोच. माणसाची समाजात आणि समाजाची माणसात मोठीच हिस्सेदारी असते. आपल्या सारख्या असंख्य डोक्यांची उतरंड म्हणजे आपला हा समाज. उतरंड ह्यासाठी की हा समतल नाही. एकेकाळी पृथ्वी सपाट आहे असं मानलं जायचं. मग विज्ञानाची क्रांती झाली आणि पृथ्वी गोल असल्याचं सिद्ध झालं. पण ह्या गोलाईतही काहि गडबड आहेच. काही गोष्टी वर जातात तर इतर खाली. खालचे वर जाईल आणि जे वर आहे ते यथावकाश खाली येईल असं ओघाने ठरून गेलेलं. आपल्या मागच्या अनेक पिढ्या लौकिकार्थानं खालीच दबून मेल्या असं म्हणायला भरपूर वाव आहे.                पण आपण खरोखरच वर जातो आहोत का ? जिला उर्ध्वगामी म्हटलं जातं अशा लोकसंख्येत आहोत का ? आपण भरपुर कर भरतो. बर्यापैकी पैसा धरून आहोत. बहुधा आपण ह्या उर्ध्वगामी रेषेचा आरंभबिंदू आहोत. आपल्या पुढच्या पिढ्या ह्या खर्याखुर्या अर्थाने वरच्या प्रतलात जातील आणि जगतील.

                     शिवाय हि उतरंड विश्वव्यापी आहेच.म्हणजे अमुक देशात अमुक धर्म भारी. त्या धर्मातही तमुक लोक इतरांहून जड.उबग, शिसारी आणणारा प्रकार. प्रगत देशांनाही वर्गसंघर्ष चुअकलेला नाही. आणि आपण तर जाणूनबुजून मागास देशाचे नागरीक. सरकारी कार्यालयांमधून समाजातलया ह्या खाचखळग्यांचे प्रदर्शन जरा जास्तच ठाशीव पद्धतीने घडून येते. तिथे वर्ग लढ्याला अधि़कृत संरचनेत बांधलं गेलं आहे. माणसांच्या श्रेणी पाडल्या गेल्या आहेत. म्हणजे तुमच्या डोक्यात आणि मनात स्वत:च्या इभ्रतीबद्दल काही संशय येण्यासाठी जागाच ठेवली गेलेली नाहीए. ही प्रथम श्रेणी. इथे उच्चशिक्षित, उच्चपदस्थ लोक वसतात. पांढरीशुभ्र कॉलर असणारे मोठे लोक. त्यानंतर द्वितीय. मग ह्याच क्रमाने खाली. थोडक्यात आपापल्या वजनाप्रमाणे नीटनीट रहा. रेषेत पडा. थोडेही इकडे तिकडे होवू नकात. झालात तर ह्या परमसुखदायी व्यवस्थेतून तुम्हाला त्वरेनं बाहेर केलं जाईल.
             
                     एव्हढी आखीव, भर-भक्कम व्यवस्था. आपल्याला शाळेत असताना पाठ्यपुस्तकातल्या पक्की घरे ह्या संज्ञेचं मोठं अप्रुप होतं.वादळवारा, उन पावूस पचवून उभी राहणारी संस्था. तशीच ही व्यवस्था. पक्की तर आहेच पण सीमाकर देखील. तुम्हाला सीमेत बांधून ठेवणारी. ही व्यवस्था नसेल तर बहुतेक अनागोंदी येईल. सर्वत्र गोंधळ माजेल ह्या भीतीच्या बडग्याने सर्वाना एकत्र बांधून ठेवणारी मजबूत साखळी. ह्या व्यवस्थेच्या सीमांमधून होणारा आपला जीवनसंघर्ष. ह्या संघर्षात बरे वाईट, पापपुण्या ह्या सारख्या गोष्टीना कितपत वाव आहे? अजूनही आपल्या सभोती काही लोक नैतिक वागतातच, जसं की ऑफिसातला गायके बाबा. वयस्कर आहे आणि धार्मिक म्हणून त्याला सारे बाबा म्हणतात. बाबाला एक मुलगी आहे आणि एक लहानसं घर.तो कधीही कमीशन घेत नाही. म्हणतो माझा हिस्सा तुम्ही घ्या. मला माझ्या अधिकारात जितकं मिळतं तितकं पुरे.

                    बाबा खरोखर पुण्यवान आहे का ? की तो कठल्यातरी चुकीचं प्रायश्चित्त घेतो आहे ? लाच घेणे, भ्रष्टाचार करणे हे पाप आहे का ? की ती ह्या युगाची जनरीत आहे. मोठमोठे खेळाडू, अभिनेत कर बुडवतात. हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का ? सदाकाकाचा लहाना मुलगा - गिरीश - आपल्याला नेहमीच सांगतो की तो टॅक्सी , हॉटेलाची बोगस बिलं देतो कंपनीत. कोण बघतं. शिवाय म्हणतो की ह्या कंपन्या आपल्या जीवावर अब्जो कमावतात. मग आपण काय घोडं मारलंय कुणाचं ?
                    एकूण पुण्य म्हणजे काय? आणि पाप कशाला म्हणावं? एक उदाहरण घेऊत. समजा एक अनाचारी बाप आहे ज्याने नाना लबाड्या करून प्रचंड संपत्ती उभी केलीए. त्याची मुले सज्जन आणि सरळमार्गी आहेत. त्याना बापाची कर्मे नकोत - पण त्याचं ऐश्वर्य जे परंपरेनं त्याना मिळून जाणारं आहे, किंवा मिळतं आहे , त्याचं काय ?
       
                    आता ह्याच्या उलट बघू. एक अतिशय पुण्यवान माणूस आहे सरळमार्गी. एक छदामही कुणाकडून न घेणारा. त्याची मुले यथातथा वाढली. पुढे मुले नैतिकतेत न बसणार्या गोष्टी करून मातब्बर झाली. आता त्या पुण्यवान माणसाने काय करावे ? आपल्या पुण्याचं फळ आपल्या पुढच्या पिढ्याना मिळतं आहे असं म्हणावं का ? की आपल्या मुलांनी नैतिकता सोडून दिलीए म्हणून कुढत बसावं ?

                     निर्णय कठीण आहे. पाप करणारा आणि पुण्य करणारा, यथावकाश दोघेही मरतील. कदाचित त्यांचा निवाडा होत असेल. न्यायाचा एक दिवस असतो असं बहुतेक धर्म मानतात; जो कुणीही पाहिलेला, अनिभवलेला वा भोगलेला नाही. एकूण नैतिकता ही मोठी सोयीची गोष्ट आहे. जघन्य अपराधांपासून माणसानं दूर रहावं म्हणून समाजातल्या प्रतिभावंत आणि विचारी माणसांनी घडवलेली गोष्ट. ही नसती तर समाज रानटी झाला असता हे खरंच; ती माणसाला कक्षेत ठेवण्यासाठी हवीच खरी - पण लोकानी जगता जगता तिची सोय करून घेतली. हवी तशी वापरता येण्याजोगी, लवचिक बाब.

                         असे ह्जार प्रश्न, हजार विवंचना डोक्यात घेवून आपण वापस निघतो. प्रवास ह्या प्रश्न उपप्रश्नांच्या ससेमिर्यामुळे नकोसा होत असावा आपल्याला बहुतेक.

--

अनंत ढवळे

copyright @ Anant Dhavale
(क्रमश: / संपुर्णतः काल्पनिक )
                   
Monday, September 5, 2016

बेरंग - भाग एक

कथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा.

--
बेरंग
--
आता हा नवा अधिकारी आल्यापासून सगळ्यांची हालत खराब झाली आहे, तो पैसे खाऊ देत नाही, स्वतः ही खात नाही. सुरुवातीला आपण याच्याशी मैत्री करून पाहिली. आपल्या लायनीत घ्यायचा प्रयत्न केला, पण काही फायदा नाही. तसा वागायला बोलायला बरा आहे. भरपूर शिकलेला आहे. तालेवार घरातला आहे. ह्याचे वडील देखील अधिकारीच होते, थेट कॅबिनेट सेक्रेटरीच. चिक्कार पैसा धरून आहेत. शिवाय दिसतातही नीटनेटके, श्रीमंत. काही लोक दिसतातच पैसेवाले, चकचकीत. हा त्यातलाच आहे. हे असं इतरानाही दिसतं का हे तपासून पहायला पाहिजे. एकदा चंद्याला विचारू. भडवा आपल्यासारखाच आहे. यथातथा परिस्थितीतून आलेला. पण बिनधास्त असतो. मौजमजा करतो. जोक सांगतो सगळ्याना. जिथे जाईल तिथे पॉप्युलर होतो. शिवाय बायाना घुलवण्यात तर एक नंबर आहे. चंद्या वागायला फारच नैसर्गिक आहे. आपल्यासारखा नाही. आपण मनमोकळे बोलत नाही अशी तक्रार सगळ्यांचीच असते. साली सवयच नाही . आपण फक्त पिल्यावर मोकळ ढाकळं बोलू शकतो. हा कदाचित आपला न्यूनगंड असावा.आपल्या डोक्यात काही खेळ सुरू असतो, आणि आपण त्या खेळात गळ्यापर्यंत बुडलेले. मध्येच कुणीतरी काही विचारतो आणि आपल्या खेळात खंड पडतो. मग आपण काहीतरी बोलून वेळ मारून नेतो.चंद्या आपल्याहून खूपच बरा आणि चतुर.आपण आणि चंद्या दोघानी मिळून या नव्या साहेबाला समजावयाचा बराच प्रयत्न केला. आपण जे करतो ते करप्शन नाही, तर कट प्रॅक्टीस आहे. डॉक्टर लोक करतात तशी. आपण फक्त कमीशन घेतो, पण काम चोख होईल याची खातरजमा करतोच. आपल्या नियंत्रणाखाली बनलेल्या सुरगाव रस्त्याचा दाखला दिला. म्हटलो गाडीत बसून चहा पीत जा. बशीतून एक थेंब सांडायचा नाही एवढा मुलायम रस्ता आहे. एक खड्डा नाही त्यावर. गालाशेठ आपला दोस्त कंत्राटदार आहे. पैसा भरवतो इथून तिथून सगळ्याना पण काम साला चोख बजावतो. पण साहेब बधला नाही, म्हटला भ्रष्टाचार देशाला संपवून टाकेल एक दिवस. या विधानावर चंद्या बावळटासारखा फिदी फिदी हसला होता. आपण नंतर झापला त्याला. म्हटलो तू साला चुतिया आहेस. कुणासमोर काय बोलायचं ते कळत नाही तुला. आपलीच गल्ली असल्यासारखा बरळत सुटतो. तर म्हटला झिगझिग करू नकोस जास्ती. तो साहेब बधेना झाला म्हणून तू वैतागला आहेस. त्याच्या बोलण्यात तसं तथ्य होतं. गेले दोनेक महिने झालेत कंत्राटदार घाबरून फिरकतच नाहीत ऑफिसकडे. संध्याकाळी भेटतात, दारू बिरू पाजतात. सोबती कोंबडी, मटण. दारूही स्कॉच. म्हणतात या साहेबाचं करा काही तरी. आपण म्हणतो तो आपल्यापेक्षा वरच्या हुद्द्यावर आहे. शिवाय त्याच्या बापाची सर्वत्र ओळख. भडवा कॅबिनेट सेक्रेटरी होता. त्याने खा खा खाल्लं त्याच्या काळात पण पोराला वाटतं आपला बाप भली इमानदार. आपण काय झाट वाकडं करू शकत नाही त्याचं. आता तो आहे तोवर बसा उगी शांत. पण कंत्राटदाराची जात मोठी चिकट.कामाच्या माणसाला पटवण्यासाठी वाटेल ते करतात. पार्ट्या, बाया न वाट्टेल ते. एवढी सरबराई करतात की डोक्यात हवा जाते. आपण कुणीतरी मोठे आहोत असं वाटायला लागतं. गेल्या वर्षी आपण एक मोठं टेंडर काढल. त्यात गाडी आली. इथल घर झालं. पुढच्या दोनतीन टेंडरात पुण्यात फ्लॅट झाला. अजून आपलं लग्न व्हायचं न त्या आधीच आपली तीन तीन घरं. लोकांचं एकही होत नाही. साला एके काळी आपली ऐपत नव्हती कोल्ड्रिंक प्यायची. न आता हे थाट. हालत बदलत जाते माणसाची. मागच्या लोकांचं पुण्य म्हणा की आणखी काही. पण दिवस बदलत जातात. पण अनेकाना हे समजत नाही आणि मग ते तिथेच अडकून पडतात. आपल्या सदाकाकासारखे. दरवेळी भेटला की लेक्चर देतो. सचोटीने राहा. पैसा खाणे बरे नाही. करप्शन फार दिवस चालत नाही.भले भले डुबले तिथं तुझं काय? तुझा बाप देवमाणूस होता. कधी कुणाचा एक पैसा शिवला नाही त्यानं. आपण सदाकाकाचं मन राखायला ऐकून घेतो. सदाकाका इमानदार माणूस आहे. आयुष्यभर बँकेत प्यून म्हणून राबला पण पोराना व्यवस्थित शिकवलं. आमचीही वेळोवेळी मदत करायचा. आईला याचा आणि काकूचा मोठा आधार वाटायचा. आता काकाची पोरं आपल्याकडून अडल्यानडल्याला पैसे नेतात.त्याला हे माहितच नसतं.आपण सढळ हाताने देतो. कधी विचारीत नाही कशासाठी पण ते सांगतात. मागे लहान्याच्या घराची सुरुवातीची रक्कम कमी पडत होती म्हणून तो आला. आपण चार लाख असे दिले. येतील तेंव्हा दे म्हटलो. पण तोही इमानदार. हातउसण्याची नोटरी घेऊन आला आणि सही करून देऊन गेला, सहा महिन्यात बिनव्याजी देतो म्हणून. आपण हसलो.तो म्हणाला तुझं हसणं कशासाठी आहे - मी पैसे देणार नाही असं वाटतंय म्हणून का? आपण म्हटलो नाही रे. सध्या वरकमाई बंद आहे, तुझ्याकडं वापस मागायची वेळ येते की काय असं वाटलं म्हणून हसलो. पण खरंच का हसलो आपण. साला हा काळ आणि तो काळ असलं काही स्वतःची पाठ थोपटण्याचा काहीतरी प्रकार होता तो. पैशाची खुमखुमी असतेच माणसाला. काही मान्य करतात काही करीत नाहीत.
यावेळी सदाकाका, त्याची पोरे, काकू आणि सगळा भूतकाळ तेंव्हा डोळ्यांपुढून वाहता झाला. माणसं म्हणजे पाऊलखुणा किंवा वर्षांची चिन्हे बनून राहतात. प्रत्येकाची एक खूण, एक चिन्ह. वडील गेल्यानंतरची भकासी आठवली. घरात आपण आणि आई दोघेच. अधून मधून एखादा दूरचा नातेवाईक भेटायला यायचा. एरवी सदाकाका आणि त्याचं कुटुंब हेच आमचे साथीदार. ते शेजारीच राह्यचे. सणासुदील घरी वगैरे बोलवायचे. आपण तेंव्हाही तिथे तटस्थासारखे वावरायचो. क्वचित बोलायचो. पोर्या लैच कमी बोलतो असं काकी म्हणायची. साधू बोवा बनतो क्काय अशी गंमत करायची. पण आपण निव्वळ वडील गेले म्हणून गप्प झालो होतो का. की ती निव्वळ एक घटना होती आपली सत्वपरीक्षा पाहणारी. हा माणूस तुटतो की तुटत नाही हे बघण्यापुरती तात्कालिक आपदा. एरवी मरणारा सुटतो असे घरीदारी सर्रास बोलतात लोक. मागे उरणार्‍यांचीच अवस्था होते. पण ही दुर्गत सगळ्यांचीच होत असावी. एरवीही या समाजात आपण एकटेच नसतो. आपल्या सभोती माणसांचा अफाट गराडा असतो, त्या गराड्यातल्या प्रत्येकाची एक कथा असते. थोड्या बहुत फरकाने बहुतांची पांगाडीच होते. निदान आपल्या दुनियेतल्या माणसांची तरी. ही दुनिया मध्य शहरी लोकांची होती. वीसेक वर्षांपुर्वी लहान खेडेगावांतून लहान शहरांमध्ये आलेले लोक. या शहरांमधून असणार्‍या गावासारख्या भागांमधून एकत्रित राहणारे लोक. शहरात आले तरी आपली भाषा न आपला चेहेरा जपून राहिलेले लोक. त्यामुळे समुहाच्या सुरक्षिततेत असणारी आपलेपणाची भावना तिथे होतीच. पण आपण या सगळ्यामध्ये राहूनही तुटकच होतो, आहोत. आता तर त्या जीवनाचा मागमूसही राहिलेला नाही आणि आपण खूप लांबवर निघून आलो आहोत. पण आई अजूनही तिथेच राहते. आपण अनेकदा मागे लागूनही तीने ते घर सोडलेलं नाही. म्हणाते तुझ्या वडीलांच्या आठवणी आहेत या घरात. आपण एवढा पैसा कमावला पण तीने कधी काही मागितलं नाही. वडलानी मागे सोडलेलं घर आणि पोस्टातले तीन लाख रुपए, एवढी बेगमी तिला आयुष्यभरासात पुरेशी आहे. वडील गेले त्यानंतर त्या पोस्टातल्या पैशावर मिळणारं व्याज हीच आमची एकमेव कमाई होती. तिच्यावर आईने घर चालवलं. आपलं शिक्षण पूर्ण झालं ते इबीस्या लाऊन लाऊन कसंबसं. आधी पदवी मिळवली आणि मग पदव्युत्तर शिक्षण. तोवर यव वाढून गेलं होतं, सोबतचे गडी करते सवरते झाले होते. कमी शिक्षणामुळे त्यांची गत यथातथाच होती पण निदान कमावते झाले होते. त्यातले एखाद दोन अधून मधून भेटायचे, बियर पाजायचे. आपल्याला ही छानछौक शोभत नाही असं वाटूनही आपण नैराश्य घालवण्यासाठी म्हणून थोडीफार घ्यायचोच. आता गंंमत म्हणून दिवसाआड महागडी पितो तेंव्हा जुने दिवस आठवतात. शिक्षण होऊनही सुरुवातीला हातात काहीच नव्हतं. मग आपण एका विना अनुदानित शाळेवर क्लर्कची नौकरी धरली. आठशे रुपए महिना ठरलेला पण दरमहा मिळेलच असा नेम नव्हता. बघता बघता तिथं साताठ महिने गेले. पैकी चारच महिन्यांचा पगार झाला, बाकी डुबले, पण या पैशाचाही केवढा आधार झाला होता.आपण आईसाठी एक साडी घेतली , घरात काही वस्तु घेतल्या.मग एक दिवस सरकारी परिक्षेची जाहिरात पाहिली आणि अर्ज भरला. अक्कल हुशारीने आधी प्रवेश परिक्षा आणि नंतरची मुलाखत काढते झालो न ह्या नौकरीचा धडा सुरू झाला. पहिल्या वर्षभरात नुसतीच हौसमौज केली. कपडे घेतले.मग एक मोटारसायकल. नातेवाईकानाही काहीबाही भेटी दिल्या. लेकरू लईच गुनाचं हाय ओ माय. काकी कौतुकानं हेल काढून बोलायची. मग बदली झाली. जालन्यातल्या राहत्या घराची डागडुजी करून आपण इथे आलो. इथे येऊन गेल्या काही वर्षांत आपला डील डौल पारच बदलून गेलायं.आई मात्र तिथेच थांबली. कधी मधी येते आपल्यासोबत राहायला. म्हणते भौ लग्न कर. मला मरण्याआधी नातवंडांची तोंडे बघू दे. आपण नुसतीच मान हालवतो. एकतर आपले नातेसंबंध साधारण त्यामुळे चांगल्या शिकलेल्या पोरी सांगून येत नाहीत. त्यात तशी गरजही नाही आणि आपल्याला बंधनात अडकायची इच्छाही नाही अजून. आलेल्या पैशावर अजून हौसमौज करायचीय अजून. एवढ्यात लग्नाची कटकट नको.सोबतच्या रुईकराचे हाल बघतोच आहे की.जरा निवांत बसला की आलाच बायकोचा फोन. पक्का घरघुशा झाला आहे. नाहीतर कसला मुजोर होता. भडवा पुर्णविरामाच्या जागी शिव्या द्यायचा. आजकाल होरे नाहिरे असं काहीसं बोलत असतो. आपण असेच होऊ याची गॅरंटी नाही पण काय सांगा ?

यंदाचा उन्हाळा खूपच तापदायक दिसतो आहे. संध्याकाळ तशी आल्हाददायक असते. दिवसभर पण नुसती काहिली. करोडोंची कंत्राटं पास करत असलो तरी आपण काम करतो ते या जुनाट सरकारी ऑफिसात. इथे एअर कंडीशनिंग नाही. डेझर्ट कूलर दिवसभर आवाज करत सुरू असतात पण जीवाची काहिली काही कमी होत नाही. झक मारली न सरकारी नौकरी धरली. नाहीतर सदाकाकाचा मोठा मुलगा. कुठल्याशा कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. सांगतो की दिवसरात्र भन्नाट एसी सुरू असतात. स्वतःच्या केबिनमध्ये बसून काम करतो निवांत. बरेचदा तर घरूनच काम करतो. शिवाय अधून मधून परदेशातही जातो. जिथे जाईल तिथले फोटो आपल्याला आवर्जून पाठवतो. त्याच्या भाषेत बोलायचं झालं तर जीवनाचा आनंद लुटतो. हे फोटो बिटो आपल्याला उथळपणाचे लक्षण वाटते एरवी, पण ह्या भावाचे मात्र कौतुकच वाटते. मागे पुढे परदेशातच स्थाईक होइन म्हणत असतो. बाकीचे नातेवाईक हटकतात, पण आपण त्याची नेहमीच पाठराखण करतो. मागे त्याने त्याच्या ऑफिसातले काही फोटो दाखवले. चकचकीत, निळसर काचेरी उत्तुंग इमारती. विचार आला, आपण इथे बक्कळ पैसा मिळवतो पण निव्वळ भंगारात काम करतो आहोत. इमारतीतली लिफ्ट कधीच चालू नसते. सगळ्या जिन्यांच्या भिंती लोकानी पानाच्या पिचकार्या टाकून टाकून रंगवलेल्या. शासन लवकरच बजेट काढणार आहे म्हणताहेत, या इमारतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी. कराल बाबा पण तोवर वैताग आहे. शहरातली प्रचंड गर्दी टाळत टाळत इथवर पोचेतो कंटाळायला होतं. त्यात हा जीवघेणा उकाडा. सरकारी कामांची तगतग, दिवसभर भेटायला येणारे लोक, मंत्र्यांचे दौरे आणि वैतागवाण्या इतर अनेक गोष्टी. त्यात आता कुठलातरी सरकारी महोत्सव आला आहे. साहेबाला यात भारी रस. सगळे नियोजन त्याच्याच हातात आहे. त्याच्याबरोबर आपण आणि चंद्या आहोतच. शिवाय सगळी यंत्रणा. साहेब तर साहेब, त्याचा बापही या बाबतीत भलताच रसिया. आजकाल तोही येऊन बसतो ऑफिसात. मोठमोठ्या गप्पा हाणतो. नको तिथे नाक खुपसतो. नवी पिढी तत्ववादी नाही म्हणत असतो. आम्ही कशी कामे केली पहा म्हणतो. एक पैसा घेतला नाही कुणाचा कधी न काय काय. आपण शांतपणे ऐकून घेतो, काही बोलत नाही; पण चंद्या खूपच वैतागतो. एकतर सध्या पैसा मिळत नसल्याने तो निव्वळ कावलेला असतो आजकाल. त्यात सरकारी कार्यालयांची दुनिया छोटीच; कोणी कुठल्या योजनेत किती मलिदा दाबला ह्याची नेटकी माहिती सगळ्यांकडे असते. एक दिवस साहेबाचा बाप फारच रंगवून आपल्या साधेपणाच्या गोष्टी सांगत होता. बराच वेळ त्याची लामन सुरू होती. शेवटी चंद्याकडून राहावले नाही. म्हणाला साहेब आपण आम्हास वडीलधारे. पण आपण आणि तडपल्लीवार साहेबांनी मिळून उभे तिरना धरण लुटून खाल्ले हे अक्ख्या दुनियेला माहिती आहे. साहेबाचा बाप यावर चाटच पडला. संतापून जो निघून गेला तो पुन्हा ऑफिसकडे फिरकलाच नाही. आपण चंदयाला म्हटलो, चंद्या तुझ्या जिभेला हाड नाही, पक्का अवकाळी आहेस. कधी कुणाची उतरवशील नेमच नाही. पण हे काम जबरी केलंस गड्या. म्हातारा जाम इरिटेटींग आहे. बरा कटवला त्याला. अर्थात साहेबाचा बाप नसला तरी साहेब होताच. हा महोत्सव म्हणजे घरचं कार्य असल्यासारखा लगबगीने फिरत होता पाची दिवस महोत्सवाच्या शामियान्यांमधून. परत आपला परिचय करून द्यायचा कलाकारांसोबत. हे अमुक साहेब, तमुक साहेबांचे नातू. मोठे कलाकार आहे. आपण काय कमी कलाकार आहोत का असे यावर चंद्या हळूच बोलायाचा आणि आपण जाम हसायचो. बरं या कलाकार मंडळींचा थाटही भारीच. एकदा एक उस्ताद आले ते एकदम हळदी रंगाचा तलम झब्बा घालून. तोंडात विडा रंगलेला. गळ्यात पिवळी धम्मक सोन्याची साखळी. सोबत चार पाच प्रौढ बायकांचा घोळका. आपण चंद्याला म्हटलो, साला तू नुसताच तब्ब्येतीने रसिया. असं पिवळं धमक राहाता आलं पाहिजे गड्या ! ह्यावर चंद्या नेहमीच्या स्टाईलीत बकाबका हसला. त्यात ह्या उस्ताद साहेबांनी भलं मोठं लेक्चर दिलं. संस्कृती आणि परंपरा, आपला इतिहास. मग त्यांच्या गुरूच्या गोष्टी नि ह्यांच्या गुरूभक्तीच्या. अनेकदा कानाला हात लावत होते. आपण अशावेळी फार बोलत नाही. ऐकून घेतो. कोण जाणे खरंच मोठा माणूस असावा. आपण मूर्खासारखे काही बोलून तोंडघशी पडायचो. आपला चिंतकाचा पिंड नाहीच, पण बर्‍याच गोष्टी पटत नाहीत आपल्याला. या उस्तादांबद्दल्ही असंच झालं. आपण बराच वेळ ऐकत राहिलो आणि मग काहीबाही सांगून तिथून निघते झालो. आपला साहेब एरवी समजदार, पण त्याला प्रसिद्ध लोकांसोबत मैत्री करण्याचा मोठाच सोस.आता तर त्याच्या उत्साहाला धुमारेच फुटले होते. काहीबाही बोलत होता उगाच मध्ये-मध्ये. मध्येच आपला महागडा मोबाईल दाखवत आपण किती संगीत ऐकले आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. नको तिथे वाह वाह म्हणत होता. हे उस्ताद आपल्या क्षेत्रात पोचलेले. मनातल्या मनात साहेबाला मूर्खात काढत असावेत असे त्यांच्या सूचक हास्यावरून वाटत होते. या उस्ताद लोकाना अशा उथळ पण महत्वाच्या चाहत्यांची भारीच गरज असते. कलाकार असो वा सरकारी नोकर. शेवटी प्रत्येकालाच पोट आहे. प्रत्येकाला आपापले दुकान चालवायचे आहेच. भूक ही मूलभूत गरज. त्या नंतर येते ती धनेषणा आणि कामेषणा. या नंतर येणारी सामाजिक महत्वाकांक्षा माणसाला अनेक गोष्टी करायला लावते. उथळांसोबत उथळ होणे ही त्यातलीच एक. त्या रात्री त्या विशिष्ट गराड्यात आपणही बराच वेळ उथळ होते झालो. जगराहाटीला सामील होऊन वाहते झालो. असो.
हा महोत्सव एका मोठ्या वास्तूच्या पायथ्याशी होता. मागे भला मोठा भव्य पहाड. लोक त्याला खडक्या पहाड म्हणत. आपण शामियाना सोडून बाहेर आलो. तिथून चालत चालत मागच्या मोकळ्या मैदानात. मध्यरात्रीची वेळ, शामियान्यातून येणारा वीजदिव्यांचा प्रकाश आणि वर चंद्र चांदण्यांचा सावकाश उजाळा. या उजेडात मागचा पहाड प्रचंड दिसत होता. धीरोदात्त. हजार गोष्टी गिळून घेऊन स्थितप्रज्ञासारखा उभा. आपण किती किरकोळ आहोत ह्याची जाणीव त्यावेळी प्रकर्षाने झाली. बहुतेक गोष्टी आपल्या समजण्यापलिकडच्या. निव्वळ अनुमेय, अपरिमेय. आपण उगाचच पहाडाच्या उंचीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला न मग ओशाळलो. ह्या धीरोदात्त अपरिमेयापुढे आपण निव्वळ मोजण्याइतपतच आहोत.अशा वेळा मोठ्या कठीण असतात. माणूस उगाचच नको त्या गोष्टींबद्दल विचार करू जातो. क्षणभरात डोळ्यांपुढून काय काय फिरून जातं. आपल्या लुटुपुटूच्या लढाया. आपले जय पराजय. चुकलेली हजार गणितं, प्रेम, संभोग, नाती, गोती आणि इतर हजारो गोष्टी. आणि मग एक नीरव शांतता जिच्यात सगळं काही वितळून जातं. उजेड पडण्याचा किंवा आपले सामर्थ्य नाहीसे होण्याचा क्षण. एरवी आपण या सामर्थ्यावर गुपचूप अहंकार बाळगून असतो. माझं शरीर माझ्या ताब्यात आहे. माझी परिस्थिती माझ्या नियंत्रणात आहे. मी सावध आहे. हा अहम मोठा आणि तीव्र असतो. या अशा अनाथ वेळा मात्र सगळ्याच गोष्टींचा विलय घडवून आणतात. उरत असाव्यात त्या ढोबळमानाने फक्त डोंगरापलिकडच्या गोष्टी.आपण त्या निर्व्याज प्रहराचा अनुभव घेतला कितीतरी वेळ. तासाभराने भानावर आलो ते मोबाईलची घंटी ढणाणा वाजली म्हणून.

फोनवर चंद्या असतो. कुठे गायब होतोस रे तू ?लवकर पोडीयमजवळ ये. साहेब भलताच कावलाहे. आपण उसासा टाकत काहीसे वैतागूनच पोडीयमच्या दिशेने चालू लागतो. काय झालं असेल? साहेबाला नक्की कशाचा राग आला असेल याचा विचार करत. आणि आला तरी ही काय वेळ झाली. जवळपास मध्यरात्र. शेवटचा कार्यक्रम संपून गेलेला. लोक आपापल्या घरांच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेले. पोचतो तर बघतो साहेब क्लास फोरना झापतोय. पोडीयम जवळ काही कचरा आहे जो उचलण्याची कुणी तसदी घेतलेली नाही. काही प्रेसवाले फोटो काढून, शुटींग करून गेलेत. कर्मचारी आपली बाजू समजावण्याचा प्रयत्न करतात. साहेब, ही जवाबदारी कंत्राटदाराची आहे. आम्ही काय करणार. तरी अर्ध्याहून अधिक कामे आम्हीच करीत आहोत. म्होरक्या असणारा सदाशिव बोलत असतो. उच्चशिक्षित मुलगा. इतर काही मिळत नसल्याने हे काम करणारा. वागायबोलायला एकदम व्यवस्थित. म्हटला, कंत्राटदाराला अनेकदा सांगितलं, पण तो आमचं काहीच ऐकत नाही. यावर साहेब आणखी भडकतो. जवाबदारी ढकलू नका. तुम्ही सगळे कामचोर आहात. एवढा कचरा ? त्यानं नाही उचलला तर तुम्ही का नाही उचलत ? पत्रकारांनी तब्येतीने फोटो काढलेत इथल्या घाणीचे. ह्याची आता देशभरात बोंब होईल.दिवसभर टीव्हीवर दिसत राहील हा कचरा. एवढा महत्वाचा उपक्रम, तुम्हा लोकाना काही समजत नाही. नालायक कुठले. बेजबाबदार. यावर सदाशिव बोलू जातो पण चंदन त्याला मागे लोटीत पुढे जातो. ओ साहेब. शीदा. नीट बोलायचं. नालायक कोनाला बोल्ता ? हँ ? आमाला काय याचा पगार मिळतो काय ? फालतू नई बोलायचं. सदाशिव त्याला रोखू जातो. चंदन गुरकावतो, सद्या भेंचोद मधी पडू नको उगं. मुस्काटात हानीन तुझ्या. बाकीचे दोघे तिघे चंदनला मागे ओढतात.
सगळा घोळका आता दोन भागात विभागला जातो. अनेक आवाज येऊ लागतात. चंदन सगळ्यात लाऊड. लोक आपल्याकडे लक्ष देताहेत हे बघून तो आणखीनच चेकाळतो. जोरजोरात बोलू लागतो. प्रकरण बिघडते आहे म्हणून आपण मध्ये पडतो. साहेबाला तिथून थोडे बाजूला नेतो. साहेब हपकलेला असतो. ही प्रतिक्रिया त्याला अगदीच अनपेक्षित असते. आपण म्हणतो, हे प्रकरण हाताबहेर जाईल. चंदन आडमूठ आहे. आपल्याला बधणारा नाही. त्याच्यामागे सगळे कर्मचारी आहेत. शिवाय चूक तुमचीही आहेच. नालायक कसं काय म्हणू शकता ? लोक गेले चार दिवस राबताहेत. कंत्राटदाराचे लोक दमदाट्या करतात. तो वजनदार माणूस आहे. हे लोक तरी काय करतील ?
साहेब म्हणतो, अहो तुम्ही असं कसं बोलू शकता. मी देखील राबतोच आहे की गेले चार पाच दिवस. शिवाय तुम्ही आणि चंद्रकांतही. मग यानाच काय प्रॉब्लेम आहे? आपण म्हणतो, ते सगळं ठीक आहे पण जे झालं ते टाळता आलं असतं. हे आता वैयक्तिक पातळीवर घेतलं जाईल.सरळ माफी मागून टाका. साहेब एव्हाना वरमलेला असतो पण म्हणतो मी का माफी मागू ? अशाने कर्मचारी शेफारतील. जे होईल ते बघून घेऊ. ठीक आहे, निदान आपण आता इथे थांबू नका. चंदनचा भरवसा नाही. मोकाट आहे.
तिकडे चंद्या मध्ये पडलेला असतो. का बे चंदन. तुझं डोकं फिरलं का ? ही काय पद्धत तुझी साहेबांशी बोलायची ? हा काय मोहल्ला आहे का बे तुझा. यावर चंदन कावतो, हे बगा साहेब, तुमी उगा मधी पडू नका. हे प्रकरन या साहेबाला लई महाग पडनारे. बगून घेऊ. आता चंद्याचाही आवाज चढतो. हे बघ, उगाच आगाऊपणा करू नकोस. तुझी प्रकरणे कमी नाहीत. जास्ती करशील तर गोत्यात येशील. सदा, प्रकाश, याला घेऊन जारे. लाऊन आलेला दिसतो आहे. उद्या ऑफिसात बघू काय करायचं ते. चला निघा आता आपापल्या घराकडं. आपण दुरून बघत असतो. चंद्याने प्रकरण बघता बघता निकाली काढलेलं असतं. निदान तेंव्हापुरतं तरी. थोड्यावेळाने आपण साहेबाला निरोप देऊन चंद्यासोबत तेथून निघतो. चंद्या म्हणतो आज बसू राव निवांत बोलत. या कार्यक्रमाने वीट आणलाय बघ. सरकारी गाडीने मग आम्ही तिथून निघतो.
ड्रायवर गाडी गावाबाहेर असणार्‍या एक हॉटेलाजवळ आणतो. शहराच्या वीसेक किलोमीटर बाहेर ही हॉ टेलांची अख्खी रांगच उभी राहिलेली. पूनम. चांदनी. उजाला अशी नावे असलेली हॉटेलं. हायवेच्या दुतर्फा दिव्यांप्रमाणे चमचमत असतात. काहींच्या दारात उसनं अवसान आणल्यासारखी रोशनाईही असते; अशी की जणू इथे येणारे हा उजाळा पाहून हरखून जात असावेत. काय मौज आहे. बाहेरचा उजेड आणि आतला अंधार ह्यांची सांगड अशा ठिकाणी किती सहज घातली जाते. ह्या हॉटेलांचं एक बरं आहे. इथं रात्रभर दारू पीत बसा कोणी हटकणारं नाही. तसंही आपण सरकारी, आपल्याला कोण काय करणार ? पण एक भीड असतेच माणसात. बाकी चंद्याची ओळख असते इथेही. सरबराई होते. सगळ्यात चांगलं टेबल मिळतं.थोडा वेळ हॉटेलचा मालक येऊन काही बाही बोलत बसतो. आपलं लक्षच नसतं. मघाशी झालेला प्रकार डोक्यात घोळत असतो.हा नेमका कुठला संघर्ष आहे. ह्याला वर्ग संघर्ष म्हणावे का. चतुर्थ श्रेणीबद्दल आपल्याला तसंही नेहमीच वाईट वाटतं. आपण एकेकाची कथा घेऊन मनातल्या मनात चाळत असतो. सदाशिवसारखा मुलगा. थेट एम ए आहे. अत्यंत समजदार, हुशार तरुण. याला याहून चांगली नोकरी मिळू नये? कुणाची चूक होत असावी. व्यवस्थेची, समाजाची की निव्वळ नशीबाची. चंदनसारख्याचं आपण समजू शकतो, तो शिकलेला नाही फार. मुळातच यंग्रट आहे. वालंटर टायपातला. दुसर्‍या बाजूला आपण आहोत. किंवा चंद्या, साहेब. भरपूर पैसे छापणारा या हॉटेलाचा मालक. आपण चंदन किंवा सदाशिव म्हणून जन्माला आलो असतो तर काय झाले असते असा दैवव्यपाश्रयी विचारदेखील आला. नदीच्या दोन तटांवर असल्यासारखे दोन विभक्त समाज आपल्यातून जगत असतात. थोडेसे बरे असणारे थोडेसे बरे नसणार्‍यांचा निवाडा करायला सतत सज्ज असतात. मघाशी आपण चंदनला वालंटर ठरऊन मोकळे झालोत तसे.

बाहेर पाऊस सुरू झालेला असतो. चंद्या काही योजना बनवून सांगत असतो. आपल्याला त्याच्या डोक्याची कमालच वाटते. आपण म्हणतो साला तू काही निचिंतीने बसूच शकत नाहीस. आत हे काय नवीन खूळ काढलंस. म्हणे पंढरपूरला जायचं. कोणत्या तोंडाने देवाला भेटायचं रे.आपण शंभर लफडी केलीत. खा खा पैसा खाल्ला. विठोबा म्हणेल एक हेच राहिले होते मला भेटायला यायचे. चंद्या यावर हसून म्हणतो, अरे चालायचंचं. ल्फडी कोण करत नाही? हँ ? बिनल्फड्याचा माणूस दाखव मला तू ह्या जगात. तुला एक उदाहरण सांगतो. आमचा एक काका होता. दूरचाच पण एका गावत असल्याने बर्‍यापैकी घसट होती. मोठा सात्विक माणूस होता. सगळे म्हणायचे माणूस असावा तर असा. एक दिवस आमच्या बाबांनी ह्याना शेजारच्या गावात बघीतलं दुसर्‍या बाईसोबत. नंतर कळालं की हे साहेब अनेक वर्‍षांपासून दोन घरे चालवीत होते. आता बोल. हँ? यावर आपण हसून म्हणतो अरे चालायचंचं. असेल काही अडचण बिचार्‍याची. काय सांगावे त्याची पहिली बायको त्याला समजूत घेत नसेल. किंवा ती दुसरी बाई जेन्युइन असेल आणि हा खरेच तिच्या प्रेमात पडला असेल? हेच तर. चंद्या उसळून म्हणतो. आपली देखील अडचणच आहे की रे. गरज म्हण वाटल्यास. कोणाला गरज नाही जगात? गरजेपोटी होतात गोष्टी. आपण जे केलं ते कुणीही केलंच असतं. एरवी तू न मीच काय, ही अख्खी दुनियाच करप्ट आहे.
आपण म्हणतो, चंद्या तू गोष्टी जास्तच सरळ करून समजून घेतोस. इतकं साधं आहे का हे ? मार्ग निवडण्याची ढब म्हण हवं तर, पण ती चुकते आहे आपली कुठेतरी. मग आपण काही बाही बोलून गप्प बसतो. हा दारूचा प्रभाव असावा बहुतेक. पण पुन्हा विचार येतो, चंद्या तरी काय चूक बोलतोय. ह्या सगळ्याची पक्की सवय झाली आहे; या इथून दहा वर्षं मागं जायची तयारी नाहीच व्हायची आपली आता. तो अभाव,ते जीवन नकोच पुन्हा.

फोनवर चंद्या असतो. कुठे गायब होतोस रे तू ?लवकर पोडीयमजवळ ये. साहेब भलताच कावलाहे. आपण उसासा टाकत काहीसे वैतागूनच पोडीयमच्या दिशेने चालू लागतो. काय झालं असेल? साहेबाला नक्की कशाचा राग आला असेल याचा विचार करत. आणि आला तरी ही काय वेळ झाली. जवळपास मध्यरात्र. शेवटचा कार्यक्रम संपून गेलेला. लोक आपापल्या घरांच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेले. पोचतो तर बघतो साहेब क्लास फोरना झापतोय. पोडीयम जवळ काही कचरा आहे जो उचलण्याची कुणी तसदी घेतलेली नाही. काही प्रेसवाले फोटो काढून, शुटींग करून गेलेत. कर्मचारी आपली बाजू समजावण्याचा प्रयत्न करतात. साहेब, ही जवाबदारी कंत्राटदाराची आहे. आम्ही काय करणार. तरी अर्ध्याहून अधिक कामे आम्हीच करीत आहोत. म्होरक्या असणारा सदाशिव बोलत असतो. उच्चशिक्षित मुलगा. इतर काही मिळत नसल्याने हे काम करणारा. वागायबोलायला एकदम व्यवस्थित. म्हटला, कंत्राटदाराला अनेकदा सांगितलं, पण तो आमचं काहीच ऐकत नाही. यावर साहेब आणखी भडकतो. जवाबदारी ढकलू नका. तुम्ही सगळे कामचोर आहात. एवढा कचरा ? त्यानं नाही उचलला तर तुम्ही का नाही उचलत ? पत्रकारांनी तब्येतीने फोटो काढलेत इथल्या घाणीचे. ह्याची आता देशभरात बोंब होईल.दिवसभर टीव्हीवर दिसत राहील हा कचरा. एवढा महत्वाचा उपक्रम, तुम्हा लोकाना काही समजत नाही. नालायक कुठले. बेजबाबदार. यावर सदाशिव बोलू जातो पण चंदन त्याला मागे लोटीत पुढे जातो. ओ साहेब. शीदा. नीट बोलायचं. नालायक कोनाला बोल्ता ? हँ ? आमाला काय याचा पगार मिळतो काय ? फालतू नई बोलायचं. सदाशिव त्याला रोखू जातो. चंदन गुरकावतो, सद्या भेंचोद मधी पडू नको उगं. मुस्काटात हानीन तुझ्या. बाकीचे दोघे तिघे चंदनला मागे ओढतात.
सगळा घोळका आता दोन भागात विभागला जातो. अनेक आवाज येऊ लागतात. चंदन सगळ्यात लाऊड. लोक आपल्याकडे लक्ष देताहेत हे बघून तो आणखीनच चेकाळतो. जोरजोरात बोलू लागतो. प्रकरण बिघडते आहे म्हणून आपण मध्ये पडतो. साहेबाला तिथून थोडे बाजूला नेतो. साहेब हपकलेला असतो. ही प्रतिक्रिया त्याला अगदीच अनपेक्षित असते. आपण म्हणतो, हे प्रकरण हाताबहेर जाईल. चंदन आडमूठ आहे. आपल्याला बधणारा नाही. त्याच्यामागे सगळे कर्मचारी आहेत. शिवाय चूक तुमचीही आहेच. नालायक कसं काय म्हणू शकता ? लोक गेले चार दिवस राबताहेत. कंत्राटदाराचे लोक दमदाट्या करतात. तो वजनदार माणूस आहे. हे लोक तरी काय करतील ?
साहेब म्हणतो, अहो तुम्ही असं कसं बोलू शकता. मी देखील राबतोच आहे की गेले चार पाच दिवस. शिवाय तुम्ही आणि चंद्रकांतही. मग यानाच काय प्रॉब्लेम आहे? आपण म्हणतो, ते सगळं ठीक आहे पण जे झालं ते टाळता आलं असतं. हे आता वैयक्तिक पातळीवर घेतलं जाईल.सरळ माफी मागून टाका. साहेब एव्हाना वरमलेला असतो पण म्हणतो मी का माफी मागू ? अशाने कर्मचारी शेफारतील. जे होईल ते बघून घेऊ. ठीक आहे, निदान आपण आता इथे थांबू नका. चंदनचा भरवसा नाही. मोकाट आहे.
तिकडे चंद्या मध्ये पडलेला असतो. का बे चंदन. तुझं डोकं फिरलं का ? ही काय पद्धत तुझी साहेबांशी बोलायची ? हा काय मोहल्ला आहे का बे तुझा. यावर चंदन कावतो, हे बगा साहेब, तुमी उगा मधी पडू नका. हे प्रकरन या साहेबाला लई महाग पडनारे. बगून घेऊ. आता चंद्याचाही आवाज चढतो. हे बघ, उगाच आगाऊपणा करू नकोस. तुझी प्रकरणे कमी नाहीत. जास्ती करशील तर गोत्यात येशील. सदा, प्रकाश, याला घेऊन जारे. लाऊन आलेला दिसतो आहे. उद्या ऑफिसात बघू काय करायचं ते. चला निघा आता आपापल्या घराकडं. आपण दुरून बघत असतो. चंद्याने प्रकरण बघता बघता निकाली काढलेलं असतं. निदान तेंव्हापुरतं तरी. थोड्यावेळाने आपण साहेबाला निरोप देऊन चंद्यासोबत तेथून निघतो. चंद्या म्हणतो आज बसू राव निवांत बोलत. या कार्यक्रमाने वीट आणलाय बघ. सरकारी गाडीने मग आम्ही तिथून निघतो.
ड्रायवर गाडी गावाबाहेर असणार्‍या एक हॉटेलाजवळ आणतो. शहराच्या वीसेक किलोमीटर बाहेर ही हॉ टेलांची अख्खी रांगच उभी राहिलेली. पूनम. चांदनी. उजाला अशी नावे असलेली हॉटेलं. हायवेच्या दुतर्फा दिव्यांप्रमाणे चमचमत असतात. काहींच्या दारात उसनं अवसान आणल्यासारखी रोशनाईही असते; अशी की जणू इथे येणारे हा उजाळा पाहून हरखून जात असावेत. काय मौज आहे. बाहेरचा उजेड आणि आतला अंधार ह्यांची सांगड अशा ठिकाणी किती सहज घातली जाते. ह्या हॉटेलांचं एक बरं आहे. इथं रात्रभर दारू पीत बसा कोणी हटकणारं नाही. तसंही आपण सरकारी, आपल्याला कोण काय करणार ? पण एक भीड असतेच माणसात. बाकी चंद्याची ओळख असते इथेही. सरबराई होते. सगळ्यात चांगलं टेबल मिळतं.थोडा वेळ हॉटेलचा मालक येऊन काही बाही बोलत बसतो. आपलं लक्षच नसतं. मघाशी झालेला प्रकार डोक्यात घोळत असतो.हा नेमका कुठला संघर्ष आहे. ह्याला वर्ग संघर्ष म्हणावे का. चतुर्थ श्रेणीबद्दल आपल्याला तसंही नेहमीच वाईट वाटतं. आपण एकेकाची कथा घेऊन मनातल्या मनात चाळत असतो. सदाशिवसारखा मुलगा. थेट एम ए आहे. अत्यंत समजदार, हुशार तरुण. याला याहून चांगली नोकरी मिळू नये? कुणाची चूक होत असावी. व्यवस्थेची, समाजाची की निव्वळ नशीबाची. चंदनसारख्याचं आपण समजू शकतो, तो शिकलेला नाही फार. मुळातच यंग्रट आहे. वालंटर टायपातला. दुसर्‍या बाजूला आपण आहोत. किंवा चंद्या, साहेब. भरपूर पैसे छापणारा या हॉटेलाचा मालक. आपण चंदन किंवा सदाशिव म्हणून जन्माला आलो असतो तर काय झाले असते असा दैवव्यपाश्रयी विचारदेखील आला. नदीच्या दोन तटांवर असल्यासारखे दोन विभक्त समाज आपल्यातून जगत असतात. थोडेसे बरे असणारे थोडेसे बरे नसणार्‍यांचा निवाडा करायला सतत सज्ज असतात. मघाशी आपण चंदनला वालंटर ठरऊन मोकळे झालोत तसे.
बाहेर पाऊस सुरू झालेला असतो. चंद्या काही योजना बनवून सांगत असतो. आपल्याला त्याच्या डोक्याची कमालच वाटते. आपण म्हणतो साला तू काही निचिंतीने बसूच शकत नाहीस. आत हे काय नवीन खूळ काढलंस. म्हणे पंढरपूरला जायचं. कोणत्या तोंडाने देवाला भेटायचं रे.आपण शंभर लफडी केलीत. खा खा पैसा खाल्ला. विठोबा म्हणेल एक हेच राहिले होते मला भेटायला यायचे. चंद्या यावर हसून म्हणतो, अरे चालायचंचं. ल्फडी कोण करत नाही? हँ ? बिनल्फड्याचा माणूस दाखव मला तू ह्या जगात. तुला एक उदाहरण सांगतो. आमचा एक काका होता. दूरचाच पण एका गावत असल्याने बर्‍यापैकी घसट होती. मोठा सात्विक माणूस होता. सगळे म्हणायचे माणूस असावा तर असा. एक दिवस आमच्या बाबांनी ह्याना शेजारच्या गावात बघीतलं दुसर्‍या बाईसोबत. नंतर कळालं की हे साहेब अनेक वर्‍षांपासून दोन घरे चालवीत होते. आता बोल. हँ? यावर आपण हसून म्हणतो अरे चालायचंचं. असेल काही अडचण बिचार्‍याची. काय सांगावे त्याची पहिली बायको त्याला समजूत घेत नसेल. किंवा ती दुसरी बाई जेन्युइन असेल आणि हा खरेच तिच्या प्रेमात पडला असेल? हेच तर. चंद्या उसळून म्हणतो. आपली देखील अडचणच आहे की रे. गरज म्हण वाटल्यास. कोणाला गरज नाही जगात? गरजेपोटी होतात गोष्टी. आपण जे केलं ते कुणीही केलंच असतं. एरवी तू न मीच काय, ही अख्खी दुनियाच करप्ट आहे.
आपण म्हणतो, चंद्या तू गोष्टी जास्तच सरळ करून समजून घेतोस. इतकं साधं आहे का हे ? मार्ग निवडण्याची ढब म्हण हवं तर, पण ती चुकते आहे आपली कुठेतरी. मग आपण काही बाही बोलून गप्प बसतो. हा दारूचा प्रभाव असावा बहुतेक. पण पुन्हा विचार येतो, चंद्या तरी काय चूक बोलतोय. ह्या सगळ्याची पक्की सवय झाली आहे; या इथून दहा वर्षं मागं जायची तयारी नाहीच व्हायची आपली आता. तो अभाव,ते जीवन नकोच पुन्हा.

2

मोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होवून गेलयं ते सांगते. दरवेळी एखाद दुसरा नातेवाईक ह्या ना त्या कारणाने गेलेला असल्याचे समजते. दरसाल माणसे पडत जातात. आईचं हे सांगणं बरेचदा माझे फारसे दिवस राहिलेले नाहीट हे सांगणंच असतं. आपण ओळखून विषय टाळतो.ती आपल्यासमोर वैद्यकीय तपासण्यांची अख्खी फाईल मांडते. जणू आपल्याला हे सगळं समजतं आहे अशा उत्साहात आपण ते सगळं बघतो. आईला धीर देतो. ह्यावेळी तिचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे म्हणून डॉक्टरानी तिला काही नवी औषधं सुरू केलीएत. बाटलीतलं ते लालभडक औषध बघून आपण उगाचच अरे वा म्हणतो. भारीच औषध दिसतयं. तुला नक्की आराम पडेल याने.यावर आई नेहमी प्रमाणे भला मोठा उसासा टाकते.
          तिची तगमग या तपासण्या आणि औषधांपेक्षा वेगळी आहे हे आपल्याला समजतं. खरंतर हे आपल्याला अनेक वर्षांपासून समजत आलेलं आहे. तिला नातवंडांचं तोंड बघायचं आहे. तिची अपेक्षा वयपरत्वे रास्तच आहे. एरवी तिचं आयुष्य संघर्ष आणि अभावांतच निघून गेलं होतं. वडील गेल्यापासून ते आपल्याला नौकरी मिळेपर्यंतचा काळ.  तब्बल बारा वर्षं. आमच्या बोल्ण्यात ह्या बारा वर्षांचा उल्लेख नेहमीच येतो. आई म्हणते, बाबा, रामचंद्रालादेखील बारा वर्षं वनवास सहन करावा लागला होता. आपण तर साधी माणसंच.

          मग काही बाही आठवणी निघतात. एखाद दुसरी दुखरी नस. सणासुदीच्या दिवसांमध्ये आजूबाजूच्या घरांमध्ये असणारी लगबग, रोषणाई आणि आपल्या घरातला अंधार आणि उदासी. परिस्थिती नसतानाही आई जमेल ते प्रयत्न करून आपल्यासाठी कपडेलत्ते करायची. आपण तिचं मन राखायचो पण प्रचंड वाईट वाटत राहायचं. आईच्या आनंदाचं काय? आपलं जे झालं ते झालं किमान आपल्या मुलाने चांगलं आयुष्य जगावं अशी तिचा प्रयत्न असायचा. आपण आणि आपले वडील हे तिचं सर्वस्व. वडील गेल्यानंतर आमच्या घराची आणि पर्यायाने आमचीही रया गेली.

          कुटुंबातलं एखादं मरण त्या संपुर्ण कुटुंबाला उध्वस्त करून जावं असं काहीसं होवून गेलं होतं. नातेवाईक, त्यांचे जाणते अजाणातेपणी होणारे उपकार,मदत. त्या उपकारांचं आपल्यावर झालेलं ओझं. हजार गोष्टी आहेत. घरी गेलं की ह्या सगळ्या गोष्टी डोक्यावर येवून कोसळतात. आपल्या डोळ्यांमध्ये सर्वदूर पसरून राहिलेली ही बेरंगी कुठेतरी आपल्या जुन्या दिवसांची देण असावी. खरंतर जगात रंगांची कमतरता नाही. पहाटेची केशरी भगवेपण. रात्रीची अथाह निळाई. रस्त्यावर दुतर्फा फुलणारी पिवळी-जर्द फुलं. आपल्या घरासमोरची जास्वंदी. वाट्टेल तितके रंग आहेत. आपल्याला ह्या सर्वांचा सपशेल विसर पडावा का ? की आपल्या रक्तातंच पाणी साचलं आहे ?

               कधी आला भाऊ ? एक प्रेमळ वयस्कर आवाज आपली तंद्री भंगवतो. द्रौपदामावशी, आईची मोठी बहीण आलेली असते. अरे मावशी ! तू कधी आलीस. आपण गडबडून विचारतो.
    मघाशीच आले बाबा. तुम्हा मायलेकाचं बोलणं सुरू होतं. म्हटलं कशाला खोडा घाला ! ह्यावर आई म्हणते, कायं गं आक्का, काही बोलते. तुझं येणं कसं खोडा होईल बाई? आई पुढे होत बोलते. बैस कशी इथं. मी चहा टाकते तुझ्यासाठी. आई अक्काला बसवून स्वयंपाकघरात लगबगीने जाते. आपल्या बहिणीला भेटून झालेला आनंद तिच्या लगबगीतून स्पष्ट जाणवतो.

  आई आणि अक्का दोघी सख्ख्या बहिणी. दिसतातही एकदम बहिणी बहिणीच. पण बहिणी कमी आणि मैत्रिणीच जास्त आहेत एकमेकींच्या. अक्काचा स्वभाव खूपच मायाळू. तिच्या तुलनेत आई थोडी कठोरच आहे. ऐन तारुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीने आईच्या स्वभावत कडवटपणाच येवून बसला होता. अक्का बिचारी फारच मऊ होती. एवढा मोठा संसार नेटाने सांभाळणारी. तीन पोरं आणि दोन पोरी असा मोठाच कुणबा होता तिचा. हाताला थोडीफार जमीन पण ती देखील कोरडवाहूच. घरी गरिबीचे कायम वास्तव्य. पण अक्काचं मन मोठं होतं. कधी कुणाच्या घरी रिकाम्या हातानं गेली नाही. काहीतरी घेवूनच यायची खायला. नाहीच काही मिळालं तर किमान डझनभर केळी तरी. तिच्या ह्या स्वभावाचं कायम कौतुकच वाटत आलं आहे आपल्याला. ही साधी माणसं, एवढी  मायाळू, एवढी माणुसकी असणारी. आणि दुसरीकडे आपण बघतो ते, ज्यात जगतो ते साधनसंपन्न जग.आपल्यासकट आपल्यासारख्या  कोत्या माणसांनी भरलेलं. दहा प्रकारचे विमे काढूनही आपल्याला नीट झोप लागत नाही. मागे ऑफिसाआतल्या गणपतीसाठी पब्लीकने आपल्याकडून दोन हजार वर्गणी काढून घेतली तर दोन दिवस करमलं नाही आपल्याला.
            बाकी काय, मुलं कशी आहेत ? आपण मावशीच्या एकेका मुलाचे नाव घेवून पृच्छा करतो. धाकला इथे, मधला तिथे. मोठा गावी. अजून कोणकोण कुठंकुठं. मावाशी भरभरून सांगते. आपण समजून घेतो आहोत असे दाखवण्याचा भरपूर प्रयत्न करतो. पण एवढं मोठं गणगोत, ते एका संवादात लक्षात राहणं कठीणंच. गेल्या काही दिवसांत अक्काची आर्थिक स्थिती बर्‍यापैकी सुधारलेली आहे असं समजतं. नाशिककडून आलेल्या पाण्यामुळं तिच्या शेतीचा भाव वधारला आहे. हे ऐकून आपल्याला खरंच आनंद होतो. कुठेतरी एखाद्या चांगल्या कुटुंबाचं भलं होतंय हे पाहून होणारा निरपेक्ष आनंद. मग विषयाला फाटे फुटत जातात आणि तिच्या घराचा विषय निघतो. मुलांनी तिचं घर विकायला काढलं आहे असं सांगून अक्का डोळे टिपू लागते. तिनं आणि तिच्या नवर्‍यानं मोठ्या कष्टाने बांधलेलं हे घर. त्या घरातंच तिनं आपलं बहुतेक आयुष्य काढलेलं. मुलांची दुखणीखुपणी, त्यांचं बालपण. या घरातच तिच्या नवर्‍याचा मृत्यू झाला. ह्या सगळ्या आठवणींचं अधिष्ठान असणारं हे घर मुलांनी बाप मरतो न मरतो तोच वर्षभरात विकायलाही काढलं होतं.

                  रडू नकोस, आक्का. ही तर जगराहाटीच आहे. हे जुनं घरं जाईल तर तुझ्या मुलांची नवी, सुखसुविधांनी युक्त घरं होतील हे का वाईट आहे ?  आपण उगाचंच काहीबाही सांगून तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. एव्हाना चहा घेऊन आलेली आईदेखील काही सांत्वनपर बोलू लागते. आपण आक्काला समजावण्यासाठी म्हणून बोललो खरं पण जुनं जाऊन नवं येण्याची ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा मोठीच जीवघेणी आहे. बरं झालं आपल्याला भावंडं नाहीत असा एक विचारही त्यावेळी मनात चमकून गेला.

       मावशीचं घर कुणा जवळचाच नातलग विकत घेणार आहे. मुलं घर विकून आलेला पैसा सचोटीनं वापरणार नाहीत अशी तिला काळजी वाटते. मोठ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. मधला व्यसनी आहे. धाकल्याची संगत वाईट. शिवाय मुलींना वाटा दिला जाणार नाही, त्यामुळे भविष्यात जावई उलटतील आणि हिस्सा मागायला लावतील अशी शंकादेखील तिला भेडसावते आहे. पैशावरून आताच मुलांमध्ये आणि त्यांच्या बायकांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. काय गंमत आहे पाहा, सगळी रक्ताचीच नाती, पण एकदा पैसा मध्ये आला की निव्वळ व्यवहार सुरू होतो !

       आई आणि मावशीसोबत खूपच गप्पा होतात. बघता बघता संध्याकाळ होते. जेवणानंतर फिरायला म्हणून बाहेर पडतो. पलिकडच्या गल्लीत वेरुळकर सरांचे घर आहे. त्याना भेटून यावे असा विचार येतो. वेरुळकर आपल्याला इंग्रजी शिकवायचे. तळमळीचे शिक्षक - अत्यंत कमी पगारावर जीव तोडून काम करणार्‍या आदर्शवादी-ध्येयवादी पिढीतले झाड. ह्या लोकांनी आपली उमेदीची वर्षं अशीच घालवून टाकली. ना धड पैसा मिळवला ना केलेल्या कामचे श्रेय. पण तरीही ह्यांच्या चेहेर्‍यावर समाधान दिसून येतं. अशी गोष्ट जी आपल्याला कदाचित कधीच साधणारी नाही.
                 विचार करता करता सरांच्या घराजवळ जावून पोचतो. दार उघडेच असते. सर बल्बच्या उजेडात काहीतरी वाचत बसलेले असतात.
              येऊ का सर ? आपण विचारतो. अरे ! ये की असा ! विचारतोयस काय ? सर आनंदाने स्वागत करतात. आपल्याला बसायला खुर्ची देतात. आपण उगाचच थोडेसे वरमतो. राहू द्या सर. मी घेतो खुर्ची. तुम्ही बसा. सहजच आलो होतो भेटायला उभ्या उभ्या.  अरे वा ! असं कसं तू आमचा आवडता विद्यार्थी . शिवाय आता एवढा मोठा अधिकारी. तुला खुर्ची तर हवीच. सर मिश्कील्पणे बोलतात.
               काय सर. तुमची विनोदबुद्धी भारीच. अहो मी साधा सरकारी कर्मचारी आहे. शिवाय माझ्या डोक्यावर अधिकार्‍यांची अख्खी पंगतच आहे - मी कसला आलोय अधिकारी !  अशा काहीबाही गप्पा होतात. मग चहा. सर आता बर्‍यापैकी म्हातारे दिसू लागले आहेत. सध्या ते आणि काकू दोघेच असतात इथे. दोन्ही मुलांची ल्ग्नं होवून गेलीएत. एक मुलगा पुण्यात असतो तर दुसरा मुंबईत असे समजते.
                     मुलासोबत राहायला का गेला नाहीत हे विचारण्याचं धाडस होत नाही. एक तर म्हातारा तत्वांचा पक्का आहे हे आपल्याला चांगलंच ठाऊक असतं. दुसरं हे की आपली आई तरी कुठे राहते आपल्यासोबत ? खरंतर ह्या जुन्या पिढीला आपली मुळं तोडावीशी वाटत नाहीत. आपण मात्र पक्के उपरे झालेली आहोत. सरांशी बोलता बोलता मागे पडलेल्या गावांची मनातल्या मनात उजळणी सुरू असते.सर अनेक गोष्टींबद्दल बोलतात. बदलत चाललेली कुटूंबव्यवस्था, मुंबई पुण्याकडं स्थलांतरित होत असलेले लोंढे, महाराष्ट्राच्या उर्वरित भागांवर होत असलेला अन्याय. रस्तांवरचे खड्डे, धरणात राहिलेले पाणी. राजकारण, समाजकारण, जातकारण. एक ना हजार गोष्टी.
           सर तसे समाजवादी आहेत. देशात झालेला राजकीय बदल त्याना फारसा आवडलेला दिसत नाही. आपण ह्या बाबतीत थोडे उदासीन आहोत हे संकोचत मान्य करतो. मुळात आपण मोठे झालो तो कालखंड अतिशय कंटाळावाणा होता. साम्यवाद संपल्यात जमा झालेला अणि समाजवाद मोडकळीस आलेला होता. देशात धड सामाजिक बदलही घडून येत नव्हते नि तंत्रज्ञानातही फारशी प्रगती घडून येत नव्हती. फाळणी किंवा आणीबाणी सारख्या मोठ्या घटना आपल्या पिढीने पाहिल्या अथवा भोगल्याच नाहीत. त्यामुळे आपल्या पिढीच्या विशेष राजकीय - सामाजिक भूमिकाच नाहीत असे आपण सरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग विचार येतो की कदाचित  ह्यामुळेच आपण एवढे निर्ढावलो आहोत. आपल्यापुढे आदर्श अजिबातच उरलेले नाहीत. नपेक्षा आदर्शांच्या पतनाच्या काळाअत आपण जगतो आहोत. सरांना आपण खूप मानतो पण त्यांच्यासारखे अभावांचे आयुष्य घालवण्याची आपली तयारी नाही.

                 पण मग आपल्याला जो एक सल टोचत असतो तो कसला आहे ? आई किंवा वेरुळकर मास्तरांच्या चेहेर्‍यावर जो एक संथ शांत भाव दिसतो तो आपण कधीच का अनुभऊ शकत नाही ?
                        
                              सर ज्या बदलांबद्दल बोलत असतात ती सामाजिक राजकीय स्थित्यंतरे नाही म्ह्टलं तरी आपणही पाहिलीच आहेत. नोकरीपेशा माणसात दिसून येणारं सामाजिक औदासीन्य आपल्यातही पुरेपुर उतरलं आहे. निवांतपणा आणि संथपणाची सवय होऊन गेलीए. मागे त्या कार्यक्रमात जो राडा झाला त्याने आपण  खूपच अस्वस्थ झालो होतो. आपल्या संथपणात ह्या अशा तीव्र गोष्टींचा खंड नकोसा वाटतो. आपण संघर्ष टाळतो.
           पण हे योग्य आहे का ? आपण आपल्या सभोवतालाचा एक अपरिहार्य भाग आहोत. ह्या जगात जे काही उलटपालट घडतं त्यात आपणही गुंतलेलो असतोच. माणसाची समाजात आणि समाजाची माणसात मोठीच हिस्सेदारी असते. आपल्या सारख्या असंख्य डोक्यांची उतरंड म्हणजे आपला हा समाज. उतरंड ह्यासाठी की हा समतल नाही. एकेकाळी पृथ्वी सपाट आहे असं मानलं जायचं. मग विज्ञानाची क्रांती झाली आणि पृथ्वी गोल असल्याचं सिद्ध झालं. पण ह्या गोलाईतही काहि गडबड आहेच. काही गोष्टी वर जातात तर इतर खाली. खालचे वर जाईल आणि जे वर आहे ते यथावकाश खाली येईल असं ओघाने ठरून गेलेलं. आपल्या मागच्या अनेक पिढ्या लौकिकार्थानं खालीच दबून मेल्या असं म्हणायला भरपूर वाव आहे.
    पण आपण वर जातो आहोत क ? जिला उर्ध्वगामी म्हटलं जातं अशा लोकसंख्येत आहोत का ? आपण भरपुर कर भरतो. बर्‍यापैकी पैसा धरून आहोत. बहुधा आपण ह्या उर्ध्वगामी रेषेचा आरंभबिंदू आहोत. आपल्या पुढच्या पिढ्या ह्या खर्‍याखुर्‍या अर्थाने वरच्या प्रतलात जातील आणि जगतील.

    शिवाय हि उतरंड विश्वव्यापी आहेच.म्हणजे अमुक देशात अमुक धर्म भारी. त्या धर्मातही तमुक लोक इतरांहून जड.उबग, शिसारी आणणारा प्रकार. प्रगत देशांनाही वर्गसंघर्ष चुअकलेला नाही. आणि आपण तर जाणूनबुजून मागास देशाचे नागरीक. सरकारी कार्यालयांमधून समाजातलया ह्या खाचखळग्यांचे प्रदर्शन जरा जास्तच ठाशीव पद्धतीने घडून येते. तिथे वर्ग लढ्याला अधि़कृत संरचनेत बांधलं गेलं आहे. माणसांच्या श्रेणी पाडल्या गेल्या आहेत. म्हणजे तुमच्या डोक्यात आणि मनात स्वत:च्या इभ्रतीबद्दल काही संशय येण्यासाठी जागाच ठेवली गेलेली नाहीए. ही प्रथम श्रेणी. इथे उच्चशिक्षित, उच्चपदस्थ लोक वसतात. पांढरीशुभ्र कॉलर असणारे मोठे लोक. त्यानंतर द्वितीय. मग ह्याच क्रमाने खाली. थोडक्यात आपापल्या वजनाप्रमाणे नीटनीट रहा. रेषेत पडा. थोडेही इकडे तिकडे होवू नकात. झालात तर ह्या परमसुखदायी व्यवस्थेतून तुम्हाला त्वरेनं बाहेर केलं जाईल.
             
               एव्हढी आखीव, भर-भक्कम व्यवस्था. आपल्याला शाळेत असताना पाठ्यपुस्तकातल्या पक्की घरे ह्या संज्ञेचं मोठं अप्रुप होतं.वादळवारा, उन पावूस पचवून उभी राहणारी संस्था. तशीच ही व्यवस्था. पक्की तर आहेच पण सीमाकर देखील. तुम्हाला सीमेत बांधून ठेवणारी. ही व्यवस्था नसेल तर बहुतेक अनागोंदी येईल. सर्वत्र गोंधळ माजेल ह्या भीतीच्या बडग्याने सर्वाना एकत्र बांधून ठेवणारी मजबूत साखळी. ह्या व्यवस्थेच्या सीमांमधून होणारा आपला जीवनसंघर्ष. ह्या संघर्षात बरे वाईट, पापपुण्या ह्या सारख्या गोष्टीना कितपत वाव आहे? अजूनही आपल्या सभोती काही लोक नैतिक वागतातच, जसं की ऑफिसातला गायके बाबा. वयस्कर आहे आणि धार्मिक म्हणून त्याला सारे बाबा म्हणतात. बाबाला एक मुलगी आहे आणि एक लहानसं घर.तो कधीही कमीशन घेत नाही. म्हणतो माझा हिस्सा तुम्ही घ्या. मला माझ्या अधिकारात जितकं मिळतं तितकं पुरे.

                बाबा खरोखर पुण्यवान आहे का ? की तो कठल्यातरी चुकीचं प्रायश्चित्त घेतो आहे ? लाच घेणे, भ्रष्टाचार करणे हे पाप आहे का ? की ती ह्या युगाची जनरीत आहे. मोठमोठे खेळाडू, अभिनेत कर बुडवतात. हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का ? सदाकाकाचा लहाना मुलगा - गिरीश - आपल्याला नेहमीच सांगतो की तो टॅक्सी , हॉटेलाची बोगस बिलं देतो कंपनीत. कोण बघतं. शिवाय म्हणतो की ह्या कंपन्या आपल्या जीवावर अब्जो कमावतात. मग आपण काय घोडं मारलंय कुणाचं ?
          एकूण पुण्य म्हणजे काय? आणि पाप कशाला म्हणावं? एक उदाहरण घेऊत. समजा एक अनाचारी बाप आहे ज्याने नाना लबाड्या करून प्रचंड संपत्ती उभी केलीए. त्याची मुले सज्जन आणि सरळमार्गी आहेत. त्याना बापाची कर्मे नकोत - पण त्याचं ऐश्वर्य जे परंपरेनं त्याना मिळून जाणारं आहे, किंवा मिळतं आहे , त्याचं काय ?
        
           आता ह्याच्या उलट बघू. एक अतिशय पुण्यवान माणूस आहे सरळमार्गी. एक छदामही कुणाकडून न घेणारा. त्याची मुले यथातथा वाढली. पुढे मुले नैतिकतेत न बसणार्‍या गोष्टी करून मातब्बर झाली. आता त्या पुण्यवान माणसाने काय करावे ? आपल्या पुण्याचं फळ आपल्या पुढच्या पिढ्याना मिळतं आहे असं म्हणावं का ? की आपल्या मुलांनी नैतिकता सोडून दिलीए म्हणून कुढत बसावं ?

           निर्णय कठीण आहे. पाप करणारा आणि पुण्य करणारा, यथावकाश दोघेही मरतील. कदाचित त्यांचा निवाडा होत असेल. न्यायाचा एक दिवस असतो असं बहुतेक धर्म मानतात; जो कुणीही पाहिलेला, अनिभवलेला वा भोगलेला नाही. एकूण नैतिकता ही मोठी सोयीची गोष्ट आहे. जघन्य अपराधांपासून माणसानं दूर रहावं म्हणून समाजातल्या प्रतिभावंत आणि विचारी माणसांनी घडवलेली गोष्ट. ही नसती तर समाज रानटी झाला असता हे खरंच; ती माणसाला कक्षेत ठेवण्यासाठी हवीच खरी - पण लोकानी जगता जगता तिची सोय करून घेतली. हवी तशी वापरता येण्याजोगी, लवचिक बाब.

                असे ह्जार प्रश्न, हजार विवंचना डोक्यात घेवून आपण वापस निघतो. प्रवास ह्या प्रश्न उपप्रश्नांच्या ससेमिर्‍यामुळे नकोसा होत असावा आपल्याला बहुतेक. 
--

अनंत ढवळे

copyright @ Anant Dhavale
(क्रमश: / संपुर्णतः काल्पनिक )